भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर गडगडले
By admin | Published: August 3, 2016 01:02 AM2016-08-03T01:02:45+5:302016-08-03T01:02:45+5:30
संपाचा परिणाम : शहरातील किरकोळ बाजारपेठ सुरळीत;नागरिकांची खरेदीसाठी गर्दी
कोल्हापूर : अडत वसुलीबद्दल भाजीपाला खरेदीदारांनी एक दिवस संप केल्याने मंगळवारी आवक एकदम वाढली. परिणामी दर गडगडले. कोबी, ढबू, गवार, भेंडी, वरणा, फ्लॉवर या प्रमुख भाज्यांच्या दरांत कमालीची घसरण झाली. शहरातील किरकोळ भाजी बाजारपेठा पूर्ववत सुरू झाल्या.
भाजीपाला, कांदा-बटाटा व फळे या नाशवंत मालावरील सहा टक्क्यांप्रमाणे अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करावी, असे आदेश ५ जुलै रोजी राज्य सरकारने बाजार समित्यांना दिले आहेत; पण जाहीर लिलावात चढ्या भावाने शेतीमाल खरेदी केल्याने पुन्हा अडत कशासाठी द्यायची, असा प्रश्न खरेदीदार समिती प्रशासनाला विचारीत आहेत. तरीही अडत वसुली सुरू असल्याने खरेदीदारांनी सोमवारी (दि. १) बाजारपेठ बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये कोल्हापूर शहरातील विविध किरकोळ बाजारपेठांमधील व करवीर तालुक्यातील खरेदीदार सहभागी झाले होते. खरेदीदारांनी संप केल्याने भाजीपाला मार्केट थंडावले होते. बाजार समितीची सुमारे ५० लाखांची उलाढाल ठप्प झाली होती. त्याचबरोबर शहरातील बाजारपेठा बंद राहिल्याने तेथील लाखो रुपयांची उलाढाल होऊ शकली नाही.
एक दिवसाच्या संपामुळे मंगळवारी बाजार समितीमध्ये भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामध्ये कोबी, वांगी, दोडका, फ्लॉवर, ओली मिरची, ढबू, गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडका या फळभाज्यांची आवक दुप्पट झाली. त्यामुळे दरांत कमालीची घसरण झाली. घाऊक बाजारात कोबी १५, वांगी २५, टोमॅटो ८, गवार २०, ओला वाटाणा ४५, कारली ३५ रुपये प्रतिकिलो असा दर राहिला आहे. पालेभाज्यांची आवक मंदावल्याने तुलनात्मक दरांत मात्र वाढ झाली आहे. गेले दोन दिवस सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.