नव्या रथातून येत्या गुरुवारी अंबाबाईचा रथोत्सव; आतषबाजी, रांगोळी, विद्युत रोषणाईने होणार स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 12:07 PM2023-04-04T12:07:21+5:302023-04-04T12:07:40+5:30
बाबासाहेब मुल्ला यांच्या वतीने रथावर पुष्पवृष्टी केली जाणार
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा चैत्रातील रथोत्सव यंदा नव्या सागवानी लाकडातून होणार आहे. त्यासाठी रविवारी रात्री रथाची यशस्वी चाचणी करण्यात आली असून विद्युत रोषणाईमुळे या रथाचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. रथोत्सव मार्गावर भव्य आतषबाजी, विद्युत रोषणाई, रांगोळ्या काढून मोठ्या जल्लोषात रथाचे स्वागत करण्यात येणार आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चांदीच्या रथाच्या आतील लाकडी रथ नाजूक झाला होता. त्याची आतील बांधणी सुटल्याने रथ हलत होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने तत्कालीन सचिव शिवराज नाईकवाडे यांनी नवा रथ बनवून घेतला. हा नवा रथ सुंदर नक्षीकाम व अस्सल सागवान लाकडामुळे चांदीच्या रथापेक्षाही देखणा झाला आहे. विद्युत रोषणाईने त्याचे सौंदर्य अधिक खुलले आहे.
रथोत्सवाच्या सोहळ्यापूर्वी रथाची चाचणी करणे गरजेचे असल्याने परिवहन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने देवस्थान समितीला सांगितले. त्यानुसार रविवारी रात्री रथ मंदिराबाहेर काढून चाचणी करण्यात आली. हा रथ बघताच नागरिकांनी छायाचित्र काढण्यासाठी गर्दी केली होती. रथ मार्गावर फेरीवाला संघटनेच्या वतीने रांगोळी काढण्यात येणार आहे. ज्यांना रांगोळी काढायची आहे त्यांनी आपली नावे महाराष्ट्र ग्रंथ भांडार, महाद्वार रोड येथे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता रथोत्सवाला सुरुवात होईल. महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार असा रथोत्सवाचा मार्ग असेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेब मुल्ला यांच्या वतीने रथावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे विद्युत रोषणाई, प्रसाद वाटप
न्यू गुजरी मित्रमंडळाच्या वतीने गुजरी कॉर्नर येथे मुंबई, पुणे, कोल्हापुरातील रांगोळी कलाकार रथोत्सव मार्गावर रांगोळी काढतील. तसेच परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. भव्य आतषबाजीने रथाचे स्वागत होईल. भाविकांसाठी अडीच हजार किलो रव्याचा साजूक तुपातील शिरा प्रसाद करण्यात येणार आहे.