‘अंबाबाई’च्या अखंड गजरात रथोत्सव

By admin | Published: April 23, 2016 02:18 AM2016-04-23T02:18:42+5:302016-04-23T02:25:25+5:30

मार्गावर फुलांच्या पायघड्या : रांगोळ्यांचा सडा; मंगलमय वातावरणात दर्शनासाठी अलोट गर्दी

Rathotsav in the uninterrupted Gajra of 'Ambabai' | ‘अंबाबाई’च्या अखंड गजरात रथोत्सव

‘अंबाबाई’च्या अखंड गजरात रथोत्सव

Next

कोल्हापूर : ‘अंबामाता की जय...’चा गजर, ढोल-ताशांचा कडकडाट, रांगोळी व फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, रोषणाई अशा शाही लवाजमा, एलईडी लाईट आणि फुलांनी सजलेले चांदीचा रथ आणि त्यात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची उत्सवमूर्तीवर फुलांचा वर्षाव... अशा मंगलमय वातावरणात शुक्रवारी रात्री अंबाबाई देवीची नगरप्रदक्षिणा झाली. वर्षातून एकदा चैत्रीला नगरवासीयांची भेट घेण्यास आलेल्या देवीच्या दर्शनाचा हा शाही सोहळा हजारो भाविकांनी आपल्या नेत्रामध्ये आठवणरूपी साठवून ठेवला.
फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात रात्री साडेनऊला देवीची उत्सवमूर्ती विराजमान झाली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या हस्ते रथाचे पूजन झाले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील, श्रीपूजक आदी उपस्थित होते.
तोफेची सलामी दिल्यानंतर महाद्वारातून रथ नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. देवीच्या आगमनासाठी मार्गावर दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यंदा रथोत्सवासाठी प्रथमच ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात झाली.
रथोत्सवाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. आकर्षक, रंगीबेरंगी विद्युत प्रकाशझोताने मार्ग उजळून निघाला होता. महाद्वारातून रथ गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे भवानी मंडपात आला. या ठिकाणी श्री अंबाबाईची छत्रपती देवस्थान ट्रस्टकडून आरती करण्यात आली.
रथाच्या मार्गावर विविध
संस्थांनी ठिकठिकाणी प्रसादाचे आयोजन केले होते. बिनखांबी गणेश मंदिरामार्गे रात्री उशिरा पुन्हा महाद्वारात आले आणि नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर शुक्रवार असल्याने मंदिरातील पालखी सोहळा झाला. या सोहळ्यानंतर शेजारती व त्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. (प्रतिनिधी)

शाहू गर्जना ढोलपथक आकर्षण
यंदा प्रथमच रथाच्या पुढे बँडऐवजी शाहू गर्जना ढोल-ताशा पथकाने आपली कला सादर केली. या पथकाने अखंडपणे ढोल-ताशांचा गजर करत नगरप्रदक्षिणा मार्गावर सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले. या पथकात साडेतीनशे सदस्य होते. या पथकाने सहा हात, महालक्ष्मी यंत्र, शिवतांडव, काटेवाडी, शिवस्तुती, तालठेका, कल्लोळ व इतर प्रकारचे तालबद्ध वादन केले. या पथकासह बालगोपाल तालीम येथे महालक्ष्मी प्रतिष्ठान ढोल पथकानेही हजेरी लावत अंबाबाई देवीस एकप्रकारे सलामी दिली. या पथकानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.


यंदा मोठी गर्दी
शुक्रवार देवीचा वार असल्याने दरवर्षीपेक्षा यंदाच्या रथोत्सवाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर पुन्हा देवीची मंदिर परिसरातील पालखी झाली. या पालखीलाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली. देवीच्या प्रदक्षिणा मार्गावर जागोजागी नागरिकांकडून औक्षण केले जात होते. देवीचा रथ महाद्वारात रात्री आल्यानंतर दुर्गा पोतदार यांनी दृष्ट काढली.

Web Title: Rathotsav in the uninterrupted Gajra of 'Ambabai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.