रेशन ग्राहकांचा दिवाळीचा फराळ होणार गोड अन खुसखुशीत, मिळणार हरभरा, उडीद डाळ अन साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:30 AM2018-10-05T11:30:49+5:302018-10-05T11:35:13+5:30
रेशन ग्राहकांचा यंदाचा दिवाळी फराळ गोड अन् खुसखुशीत होणार आहे. कारण रेशनवर हरभरा डाळ, उडीद डाळ व साखर माफक दरात मिळणार आहे. मंत्रिमंडळाने यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. प्रति कार्ड एक किलो डाळ व साखर दिली जाणार असून, याचा लाभ जिल्ह्यातील पाच लाखांहून अधिक ग्राहकांना होणार आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : रेशन ग्राहकांचा यंदाचा दिवाळी फराळ गोड अन् खुसखुशीत होणार आहे. कारण रेशनवर हरभरा डाळ, उडीद डाळ व साखर माफक दरात मिळणार आहे. मंत्रिमंडळाने यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. प्रति कार्ड एक किलो डाळ व साखर दिली जाणार असून, याचा लाभ जिल्ह्यातील पाच लाखांहून अधिक ग्राहकांना होणार आहे.
रेशन दुकानदारांनी विक्रीसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या संख्येत वाढ करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यासाठी वारंवार पाठपुरावाही सुरू आहे. ग्राहकांनाही या वस्तू बाजारभावापेक्षा कमी व माफक दरात मिळाव्यात व रेशन दुकानदारांनाही चार पैसे जादा मिळावेत, हा यामागील उद्देश आहे. त्यानुसार गेल्या चार महिन्यांपासून सरकारने ३५ रुपये किलो दराने तुरडाळ विक्रीसाठी सरकारने परवानगी दिली आहे.
त्याचबरोबर आता रेशनवर प्रतिकार्डवर हरभरा डाळ अंदाजे २५ रुपये किलो दराने एक किलो, उडीद डाळ ४० रुपये दराने एक किलो व साखर २० रुपये दराने एक किलो ग्राहकांना देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला आहे.
याची अंमलबजावणी दिवाळीत होणार असून, त्यामुळे ग्राहकांचा फराळ गोड आणि खुसखुशीत होणार आहे. जिल्ह्यातील १५७२ रेशन दुकानांमधून साडेपाच लाख अन्नसुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांना त्याची विक्री सुरू होणार आहे. रेशन दुकानदारांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
तुरडाळीनंतर हरभरा व उडीद डाळ ही रेशनवर मिळणार असल्याने ग्राहकांसाठी हा सुखद निर्णय आहे. बाजारभावापेक्षा निम्म्याहून कमीदराने या वस्तू मिळणार असल्याने त्याचा लाभ ग्राहकांना होणार आहे.
रेशनवर तुरडाळीपाठोपाठ हरभरा, उडीद डाळ आणि साखर देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे; त्यामुळे ग्राहकांना माफक दरात या जीवनावश्यक वस्तू मिळणार असून, अडचणीत असलेल्या रेशन दुकानदारांनाही उत्पन्न वाढीसाठी हे चांगले पाऊल आहे. सरकारने रेशनवर जीवनावश्यक वस्तूंची वाढ करावी, यासाठी पाठपुरावा सुरू असून, तो इथून पुढेही सुरू ठेवला जाईल.
- चंद्रकांत यादव,
अध्यक्ष, रेशन बचाव समिती