Kolhapur: पुरवठा विभागातील खाबुगिरीने रेशनचे धान्य काळ्या बाजारात
By भीमगोंड देसाई | Updated: February 12, 2025 17:27 IST2025-02-12T17:26:56+5:302025-02-12T17:27:22+5:30
सुट्टीच्या दिवशी हॉटेल, धाबेवाले, विक्रेते यांना विक्री

संग्रहित छाया
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : पुरवठा विभागातील खाबुगिरीमुळे गरिबाच्या अन्नावर डल्ला मारून धान्य दर महिन्याला काळ्या बाजारात जात आहे. रेशनच्या गहूपासून रोटी आणि तांदळापासून इडली तयार करण्यासाठी मोठी मागणी असल्याने हॉटेल, धाबेवाले, काही धान्य विक्रेते शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी रास्तभाव दुकानात येऊन घेऊन जात आहेत. यातून धान्य दुकानदार गब्बर होत आहेत. याची तक्रार झाली, तर कारवाई होऊ नये, म्हणून ‘साहेबां’नाही काळ्या बाजारातून कमावलेली कमाई हप्ता म्हणून पोहच करणारे रॅकेट आहे.
गडहिंग्लज पूर्व भागातील एका मोठ्या सधन गावातून दर महिन्याला रास्त भाव धान्य दुकानातून पाच क्विंटल गहू, दोन क्विंटल तांदूळ, धाबे, हॉटेलवाल्यांना विकले जात आहे. यामध्ये ‘प्रशांत’ पटाईत असल्याने मॅनेज करून सगळ्यांना ‘खिशात’ घालत आहे. असे प्रकार अनेक गावांत सुरू आहेत.
बायोमेट्रीक प्रणाली असली, तरी सदस्य संख्येनुसार धान्यांचा कोटा असल्याने सर्व सदस्यांचे धान्य न देत काही सदस्यांचेच देऊन त्यातून दुकानदार धान्यांची चोरी करीत आहेत. रेशनकार्ड, सदस्यांचा धान्याचा कोटा वारंवार बदलत असल्याने प्रत्येक रेशनकार्डधारक या महिन्यात शासनाकडून सदस्यनिहाय, कार्डनिहाय धान्य आले किती ? आणि आपल्याला दुकानदारांनी दिले किती ? याचे काटेकोरपणे मेळ घालत नाहीत.
ग्रामीण आणि शहरातील उपनगर, झोपडपट्टीतील अनेक दुकानात रेशन नेण्यासाठी अल्पशिक्षीत, ज्येष्ठ नागरिक येतात. ते बायोमेट्रीक करायचे आणि दुकानदार देईल, तितके धान्य घेऊन जातात. कार्डधारकांचे चोरलेले धान्य दुकानदार काळ्या बाजारात विकत असल्याचे आरोप होत आहेत.
रेशनचे धान्य बाजारात आणणारे दलाल
रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य गोळा करणारे अशोक, नितीन, मनोज, अरुण, प्रीतम, भरत हे दलाल सक्रिय झाले आहेत. कमाई चांगली असल्याने या दलालांनी पुन्हा उप दलालांची नियुक्ती केली आहे.
नवे एजंट सक्रिय
कोल्हापूर शहरातील रेशनकार्ड आणि धान्यासंंबंधीची कामे करून देण्याच्या दलालांच्या टोळीत अशोक, गजानन, अरुण हे नवे एजंट सक्रिय झाले आहेत. याच्यावर सध्या पुरवठा प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना हप्ते गोळा करून देण्याची जबाबदारी आहे.
रेशनकार्डमधील पत्ता बदलासाठीही हेलपाटे मारायला लावले जाते. यासाठी दोन ते पाच हजार रुपयांची मागणी केली जाते. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पुरवठा विभागातील लाचखोरीला आळा घालावा. - महेश कंदले, त्रस्त, शिवाजीपेठ, कोल्हापूर.
दिव्यांगांना अंत्योदयचे रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी पुरवठा कार्यालय परिसरातील दलाल पाच हजारांची मागणी करीत आहेत. एकदा दिव्यांग थेट कार्यालयात जाऊन रेशनकार्ड काढण्यासाठी कादगपत्रे दिली, तर एजंट संबंधित दिव्यांगाच्या घरी लाऊन धमकी देतात. - बाळासाहेब पाटील, राज्य सचिव, जिल्हा कार्यध्यक्ष, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ.
कर्नाटक सीमा भागातील रेशनमधील गहू, तांदूळ राष्ट्रीय महामार्गच्या दोन्ही बाजूला असलेल्या धाब्यावर विकला जातो. सीमेलगतच्या गावातील स्वस्त धान्य दुकानातून धाबे, हॉटेलवाले शनिवारी, रविवारी घेऊन धान्य घेऊन जातात. - एक सजग नागरिक, सीमाभाग.