महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशनचे धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:36 AM2019-06-15T00:36:57+5:302019-06-15T00:37:36+5:30
महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशन दुकानांमध्ये ग्राहकांसाठी धान्य उपलब्ध न करणाºया दुकानदारांवर आता कारवाई होणार आहे. याबाबत नुकतेच शासनाच्या पुरवठा विभागाकडून परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे महिन्यातील काही दिवस दुकान उघडे ठेवून नंतर बंद करणाºया दुकानदारांना यामुळे चाप बसणार आहे
प्रवीण देसाई ।
कोल्हापूर : महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशन दुकानांमध्ये ग्राहकांसाठी धान्य उपलब्ध न करणाºया दुकानदारांवर आता कारवाई होणार आहे. याबाबत नुकतेच शासनाच्या पुरवठा विभागाकडून परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे महिन्यातील काही दिवस दुकान उघडे ठेवून नंतर बंद करणाºया दुकानदारांना यामुळे चाप बसणार आहे.
राज्यभरात १ कोटी ५४ लाख ९७ हजार ६११ रेशनकार्डधारक आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख ४९ हजार ५२१ रेशनकार्डधारक असून, रेशन दुकानांची संख्या १५७२ आहे. रेशनवर गहू, तांदूळ, डाळ असे धान्य ग्राहकांना वाटप केले जाते; परंतु बहुतांश दुकानदार हे रेशनवरील धान्य महिन्यातील काही दिवसांपर्यंतच वाटून नंतर दुकान बंद करणे किंंवा धान्य शिल्लक न ठेवणे असे प्रकार करीत आहेत.
या संदर्भात सन २०१७च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार शिवाजीराव नाईक यांनी, रेशन दुकानांमध्ये धान्य उपलब्ध करून देण्याची सक्ती व जबाबदारी रेशन दुकानदारांवर टाकावी, अशी सूचना केली होती. त्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या आदेशानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अवर सचिव पी. जी. चव्हाण यांनी नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये ग्राहक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशनवरील धान्य घेण्यास आल्यावर त्याला धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. तसे न केल्यास संबंधित दुकानदारांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे दुकानदारांना कळविण्यात आल्याचे म्हटले आहे.
ग्राहकाच्या सोयीसाठी रेशन दुकाने आहेत. त्यामुळे ती महिनाभर सुरू असली पाहिजेत, अशीच ग्राहकांची भावना आहे. परंतु बहुतांश ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही दुकाने सुरू नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दुकानदारांना आता महिनाभर दुकानात थांबून ग्राहकांना धान्य उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.
शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धान्य विक्री सुरू असते. तसेच ‘धान्य घेऊन जावे’ असे मोबाईलद्वारे ग्राहकांना कळविणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा असावा.
- चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती.