‘अंगठ्या’वर मिळणार आता रेशनचे धान्य
By admin | Published: January 2, 2017 12:24 AM2017-01-02T00:24:51+5:302017-01-02T00:24:51+5:30
रेशनकार्डांचे संगणकीकरण : प्रायोगिक तत्त्वावर दोन दुकानांची निवड
प्रवीण देसाई ल्ल कोल्हापूर
जिल्ह्यात रेशनकार्डांचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात असून, त्याचे सरासरी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या काही दिवसांत पूर्ण करून नववर्षात रेशनकार्डधारकांना बायोमेट्रिक धान्य वितरण प्रणालीद्वारे एका ‘थंब’वर रेशनचे धान्य देण्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा प्रयत्न आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दोन रेशन दुकानांची निवड करण्यात आली असून, या ठिकाणी सर्वप्रथम ‘बायोमेट्रिक’ची यंत्रेही जोडण्यात येणार आहेत.
रेशनकार्डचे संगणकीकरण करून त्या माध्यमातून लोकांना हाताच्या अंगठ्याच्या ठशा (थंब) द्वारे रेशनचे धान्य देण्याचा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम सुरू आहे. आतापर्यंत एकूण सुमारे ९ लाख ४८ हजार रेशनकार्डधारकांपैकी जवळपास ८ लाख २५ हजार कार्डांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ही टक्केवारी सरासरी ९० टक्के इतकी आहे. यामध्ये प्राधान्यक्रम रेशनकार्डधारक सुमारे ५ लाख ५० हजार, प्राधान्यक्रम (उत्पन्न एक लाखाच्या आत असणारे) व शुभ्र रेशनकार्डधारक मिळून सुमारे २ लाख १८ हजार ७०० व अंत्योदय रेशनकार्डधारक ५६ हजार ३०० असा समावेश आहे. येत्या काही दिवसांत हे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.
संगणकीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक रेशन दुकानांमध्ये धान्य वितरण प्रणाली बसविण्यात येणार आहे. या ठिकाणी रेशनकार्डधारकांच्या थंब इंप्रेशन (अंगठ्याचा ठसा) वर त्यांना धान्य मिळू शकेल. जानेवारी महिन्यात या प्रणालीच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होईल.
कागल नगरपरिषद क्षेत्रातील एक व करवीर तालुक्यातील एक अशा दोन रेशन दुकानांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. ज्या दुकानांनी रेशनकार्डच्या संगणकीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण केले आहे, त्यांचा यामध्ये समावेश आहे. या दुकानांची माहिती पुरवठा विभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आली आहे. शासनाकडून पुढील मार्गदर्शन आल्यानंतर या दोन दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्र बसवून या उपक्रमाला सुरुवात होईल. यानंतर टप्प्याटप्प्याने इतर दुकानांमध्ये ही यंत्रे बसविण्यात येतील. रेशनकार्डशी आधार कार्डही लिंक केल्याने कुटुंबप्रमुख महिलेसह अन्य सदस्यांच्या अंगठ्यांचे ठसेही चालणार आहेत.
नववर्षात ‘स्मार्ट कार्ड’ची मिळणार भेट
बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रेशनकार्डाच्या लाभार्थ्यांना ‘स्मार्ट कार्ड’ दिली जाणार आहेत. नववर्षातील ही दुसरी भेट असणार आहे.
बायोमेट्रिक प्रणालीद्वारे रेशनकार्डधारकांना असे मिळेल धान्य
प्राधान्यक्रम - प्रतिमाणसी पाच किलो धान्य (गहू तीन किलो व तांदूळ दोन किलो)
प्राधान्यक्रम (उत्पन्न एक लाखाच्या आत असणारे) - प्रतिमाणसी पाच किलो धान्य (गहू तीन किलो व तांदूळ दोन किलो)
अंत्योदय - प्रतिरेशनकार्ड ३५ किलो धान्य (गहू २१ किलो व तांदूळ १४ किलो) व शुभ्र रेशनकार्डधारक मिळून सुमारे २ लाख १८ हजार ७०० व अंत्योदय रेशनकार्डधारक ५६ हजार ३०० असा समावेश आहे.