रेशनवर आता ३५ रुपये किलोने तूरडाळ : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांना पुढील महिन्यापासून लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:13 AM2018-07-16T11:13:33+5:302018-07-16T11:18:43+5:30
रेशनवर आता ५५ ऐवजी ३५ रुपये किलो दराने तूरडाळ मिळणार आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना पुढील महिन्यापासून डाळ उपलब्ध होणार आहे. रेशन दुकानदाराला एक किलोमागे चार रुपये कमिशनही देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी केलेली तूरडाळ ग्राहकांना माफक दरात देण्याचा सरकारचा हा एक प्रयत्न आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : रेशनवर आता ५५ ऐवजी ३५ रुपये किलो दराने तूरडाळ मिळणार आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना पुढील महिन्यापासून डाळ उपलब्ध होणार आहे. रेशन दुकानदाराला एक किलोमागे चार रुपये कमिशनही देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी केलेली तूरडाळ ग्राहकांना माफक दरात देण्याचा सरकारचा हा एक प्रयत्न आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून हमीभावाने तूरडाळ खरेदी केली आहे. कार्डधारकाला ही तूरडाळ रेशनवर यापूर्वी ५५ रुपये किलोने विक्री होत होती; परंतु कमीत कमी दरात ग्राहकाला डाळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने ५५ ऐवजी ३५ रुपये किलो दराने रेशनवर डाळीची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यात पुढील महिन्यापासून होणार आहे.
जिल्ह्याची तूरडाळीची मागणी ही ४ हजार १५७ क्विंटल इतकी आहे. ही मागणी मंजूर करण्यात आली आहे. मागणीनुसार मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून एक किलोच्या तूरडाळीचे पिशवीमध्ये पॅकिंग करून ते जिल्हा पुरवठा विभागाच्या शासकीय गोदामांमध्ये यायला सुरुवात झाली आहे.
पहिल्या टप्प्यात शिरोळ व कागल या तालुक्यांसाठी प्रत्येकी १८० क्विंटल तूरडाळ प्राप्त झाली आहे. टप्प्याटप्प्याने महिनाअखेर सर्व तालुक्यांतील गोदामांमध्ये तूरडाळ प्राप्त होणार असून, जिल्ह्यातील १५७२ रेशन दुकानांमधून साडेपाच लाख अन्नसुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांना त्याची विक्री सुरू होणार आहे.
एक किलो तूरडाळीमागे चार रुपये कमिशन रेशन दुकानदाराला दिले जाणार आहे. रेशन दुकानदाराने आपले कमिशन वजा करून ३१ रुपये हे ग्रास प्रणालीद्वारे जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत महाराष्टÑ स्टेट को-आॅपरेटिव्ह फेडरेशनच्या बॅँक खात्यावर जमा करायचे आहेत.
जिल्ह्यासाठी मंजूर झालेली तूरडाळ
तालुका मंजूर तूरडाळ (क्विंटल)
कोल्हापूर शहर ३००
पन्हाळा ४००
हातकणंगले ६७२
शिरोळ ५९०
कागल ३५०
शाहूवाडी १५०
गगनबावडा ५०
भुदरगड १५०
गडहिंग्लज १५०
आजरा २००
चंदगड १००
राधानगरी ३२५
शासनाने रेशनवर ३५ रुपये किलो दराने तूरडाळ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागणीप्रमाणे तूरडाळ यायला सुरुवात झाली असून, पुढील महिन्यापासून जिल्ह्यातील रेशन ग्राहकांना ही डाळ उपलब्ध होणार आहे.
- विवेक आगवणे,
जिल्हा पुरवठा अधिकारी