रत्नागिरी : यंत्रणांनीच घेतला विलास केळकर यांचा बळी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:27 PM2018-10-25T13:27:30+5:302018-10-25T13:39:32+5:30
देशद्रोहाचा आरोप असलेल्यांनाही चांगली वागणूक मिळते, मग लाच घेतल्याच्या आरोपाखालील माणसाबाबत सरकारी यंत्रणांची इतकी हेळसांड का, असा प्रश्नही केळकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
रत्नागिरी : पोलीस कोठडीत असलेल्या विलास केळकर यांना योग्य वेळेत उपचार न मिळाल्यामुळेच त्यांचा बळी गेला असल्याचा आक्रोश त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे. आरोपी आहे, या कारणास्तव खासगी रूग्णालय, खासगी रूग्णवाहिका टाळण्यात आली आणि सरकारी यंत्रणांनी नेहमीप्रमाणेच आपली दिरंगाई दाखवली.
त्यामुळे मेंदूत रक्तस्राव झालेल्या केळकर यांच्यावर नेमके उपचार खूप उशिराने सुरू झाल्याचा आक्षेपही नातेवाईकांनी घेतला आहे. देशद्रोहाचा आरोप असलेल्यांनाही चांगली वागणूक मिळते, मग लाच घेतल्याच्या आरोपाखालील माणसाबाबत सरकारी यंत्रणांची इतकी हेळसांड का, असा प्रश्नही केळकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आले. शनिवारी रात्री रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना परत पोलीस कोठडीत नेण्यात आले.
रविवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सकाळी साडेसात ते पावणेआठ वाजता पुन्हा जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मेंदूत रक्तस्राव झाल्याच्या संशयामुळे त्यांचे सिटी स्कॅन करणे गरजेचे होते. ती व्यवस्था जिल्हा रूग्णालयात नाही. त्यामुळे खासगी रूग्णालयात नेण्याची तयारी सुरू झाली.
केळकर हे आरोपी असल्याने त्यांना खासगी रूग्णालयात नेता येणार नाही, अशी माहिती रूग्णालयातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांच्या गाडीत बसवलेल्या केळकर यांना परत रूग्णालयात नेण्यात आले. खासगी रूग्णालयात नेता येणार नाही तर रत्नागिरीत उपचार होऊ शकणार नाहीत, या कारणास्तव त्यांना कोल्हापूरला सीपीआरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी खासगी रूग्णवाहिका चालणार नाही, अशीही टूम काढण्यात आली. त्यामुळे सकाळी १0.२0 ते १0.३0 वाजता १0८ क्रमांकाच्या सुविधेशी संपर्क साधण्यात आला.
केळकर यांच्यावर लगेच उपचार होणे आवश्यक असतानाही रूग्णवाहिका तातडीने उपलब्ध होण्याकडे लक्ष दिले गेले नाही. १0८ क्रमांकाची रूग्णवाहिका तब्बल सव्वाचार तासांनी २.४५ वाजता उपलब्ध झाली. त्यानंतर त्यात आॅक्सिजन भरून रूग्णवाहिका कोल्हापूरकडे रवाना झाली. मात्र मलकापूरला या रूग्णवाहिकेतील आॅक्सिजन संपला. त्यानंतर आॅक्सिजन भरून ही रूग्णवाहिका सीपीआरकडे रवाना झाली.
केळकर यांच्या दुर्दैवाचे फेरे त्यानंतरही संपले नाहीत. सीपीआरमध्ये केळकर यांना दाखलच करून घेण्यात आले नाही. येथे उपचार होणार नाहीत, असे सांगून तब्बल दोन तास रूग्णवाहिका आवारातच उभी होती आणि केळकर रूग्णवाहिकेतच होते. मेंदूतील रक्तस्रावाबाबत त्यांच्यावर उपचारच झाले नाहीत. तेथे उपचार होऊ शकत नसल्याने त्यांना खासगी रूग्णालयात हलवणे गरजेचे झाले.
मात्र केळकर हे आरोपी असल्याने न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना हलवता येणार नाही, असा मुद्दा पुढे आला. त्यानंतर रत्नागिरीतील संबंधितांनी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान या हालचाली करून न्यायालकडून संमत्ती मिळवली आणि त्यानंतर केळकर यांना खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र इतके तास त्यांच्यावर नेमके उपचारच न झाल्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
केळकर यांची पत्नी आणि मुलगा या दोघांचाही आक्रोश न पाहावणारा होता. योग्य वेळत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असला. त्यांना उपचारही वेळेत न देण्यासाठी ते देशद्रोही होते का? त्यांनी कोणाचे खून केले आहेत का? असा प्रश्न त्यांच्या पत्नीने केला आहे.