रत्नागिरी : रायपाटण रुग्णालयाची पुरती दुरवस्था, केवळ एकच वैद्यकीय अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 04:35 PM2018-10-06T16:35:52+5:302018-10-06T16:48:40+5:30
अपुरा कर्मचारीवर्ग व निवासस्थानांची अद्याप न झालेली दुरुस्ती यामुळे रायपाटण ग्रामीण रुग्णालयाची पुरती दुरवस्था झाली आहे. त्याची तत्काळ दुरुस्ती करून पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या रायपाटणमधील पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी उमेश चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
राजापूर : अपुरा कर्मचारीवर्ग व निवासस्थानांची अद्याप न झालेली दुरुस्ती यामुळे रायपाटण ग्रामीण रुग्णालयाची पुरती दुरवस्था झाली आहे. त्याची तत्काळ दुरुस्ती करून पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या रायपाटणमधील पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी उमेश चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
तालुक्यात राजापूर शहरानंतर एकमेव ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे असून, पूर्व परिसरातील सुमारे ४० ते ५० गावांतील जनतेला त्याचा फायदा होत असतो. मात्र, मागील काही वर्षांपासून या रुग्णालयाची अवस्था दयनीय बनली असून, अपुरा कर्मचारीवर्ग ही प्रामुख्याने मोठी समस्या बनली आहे.
दहा वर्षांपूर्वी काजिर्डा येथे झालेल्या अपघातानंतर गंभीर जखमींवर उपचार करण्यासाठी या रुग्णालयातील उपचाराच्या मर्यादा अपुऱ्या डॉक्टरांमुळे उघड झाल्या होत्या. त्यावेळी परिसरासह राजापूर, रत्नागिरीतून खासगी व सरकारी डॉक्टरांना पाचारण करावे लागले होते. त्यानंतर मागील दहा वर्षांचा कालावधी लोटला तरी येथील परिस्थितीत काहीही बदल घडलेला नाही.
आजही अपुरा कर्मचारीवर्ग ही येथील डोकेदुखी राहिली आहे. या रुग्णालयात किमान चार ते पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना तेवढी पूर्तता शासनाकडून करण्यात आलेली नाही. सध्या याठिकाणी कायमस्वरुपी डॉक्टर नियुक्त नाही. त्यामुळे उपचाराची बोंब कायम आहे. मागील आठ महिन्यांपासून एकच डॉक्टर कारभार सांभाळत आहेत. याव्यतिरिक्त अन्य कर्मचाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. एक्स-रेसह इसीजी मशीन्स, दातांचे मशिन्स आहेत. पण तज्ज्ञ नसल्याने ती धूळ खात पडून आहेत. महिला विभागात तर विद्युत व्यवस्थाही नाहीत.
रुग्णालयाची अशी स्थिती असतानाच येथील इमारतींचीदेखील दुरवस्था बनली आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असून, त्या फाईल्सवर धुळीचे थर साचले आहेत. पण निर्णय काही लागलेला नाही. त्यामुळे विस्ताराने मोठ्या असलेल्या पूर्व परिसरातील जनतेला चांगली रुग्णसेवा मिळत नाही. डोंगराळ अशा या भागात सर्पदंश, श्वानदंश, विंचूदंश यासह हृदयविकार, पक्षाघात अशा रुग्णांवर उपचारासाठी अन्यत्र जाण्याची वेळ येते. यावेळी हस्वाभिमानचे तालुका सरचिटणीस प्रसाद पळसुलेदेसाई, ओझर विभाग अध्यक्ष महेश गांगण, प्रकाश पाताडे, आबा शेट्ये उपस्थित होते.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची धडक
रायपाटण ग्रामीण रुग्णालयातील सर्व समस्यांची दखल घेऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या रुग्णालयाचा कार्यभार असणारे राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश चव्हाण यांची भेट घेऊन येथील समस्यांबाबतचे निवेदन दिले. तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा या रुग्णालयातील समस्या तत्काळ दूर करा, अशी मागणी त्यांनी दिलेल्या निवेदनात केली.