रत्नागिरी : वेड्यांना शहाणे करण्याचा तरूणांना ध्यास - राजरत्न प्रतिष्ठानची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 04:44 PM2019-04-08T16:44:37+5:302019-04-08T16:46:56+5:30
‘इऽऽ किती घाण वास येतोय’ असे म्हणत रस्त्यावर दिसणाºया वेड्यापासून सगळेच चार हात लांब पळतात. पण, याच वेड्यांना पकडून त्यांना शहाणे करून रत्नागिरी मनोरूग्णमुक्त करण्याचा ध्यासच जणू तरूणांनी घेतला आहे. रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने आतापर्यंत एक-दोन नव्हे तर चक्क २४ जणांना
अरुण आडिवरेकर ।
रत्नागिरी : ‘इऽऽ किती घाण वास येतोय’ असे म्हणत रस्त्यावर दिसणाºया वेड्यापासून सगळेच चार हात लांब पळतात. पण, याच वेड्यांना पकडून त्यांना शहाणे करून रत्नागिरी मनोरूग्णमुक्त करण्याचा ध्यासच जणू तरूणांनी घेतला आहे. रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने आतापर्यंत एक-दोन नव्हे तर चक्क २४ जणांना पकडून त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. यातील तिघे बरे होऊन आपल्या घरीही गेले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेबाबतचे असलेले प्रेम, समाज बांधिलकी व त्यांची शिकवण पुढे चालविण्याच्या हेतूने राजरत्न प्रतिष्ठानची सन २०१५मध्ये सचिन शिंदे यांनी स्थापना करण्यात आली. राजकीय पक्षात काम करताना काही मर्यादा येत होत्या. राजकारण म्हणजे एक दलदल आहे, तेथे इच्छा असूनही सामाजिक काम करता येत नाही. त्यामुळे पक्षविरहीत संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विविध घटकांपर्यंत पोहोचत असताना रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरूग्णांनाही जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांनाही आनंदाने जगता आले पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून ‘स्वच्छ, सुंदर रत्नागिरी’ बरोबरच ‘मनोरूग्णमुक्त रत्नागिरी’ करण्यासाठी प्रतिष्ठानने काम सुरू केले. एखाद्या मनोरूग्णाबाबत माहिती मिळताच त्याला पकडण्यासाठी हे सारे शिलेदार सकाळी ७ वाजताच घरातून बाहेर पडतात. मग त्याला पकडून आंघोळ घालण्याचे काम केले जाते. त्यानंतर त्याला चांगले कपडे घालून, केस-दाढी केली जाते. त्याला पोटभर जेवण दिले जाते. तेथून मनोरूग्णालयात आणले जाते. रूग्णालयाचे पत्र घेतले जाते, हे पत्र न्यायालयाकडे देऊन न्यायालयाकडून रितसर पालकत्व घेतले जाते. त्यानंतर रूग्णालयात आणून त्याच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या जातात व नंतरच त्याला मनोरूग्णालयात दाखल केले जाते. तेथे त्यांच्यावर उपचार केले जातात. आतापर्यंत जिल्ह्यातून २४ मनोरूग्णांना पकडण्यात आले आहे. यातील ३ मनोरूग्ण पूर्ण बरे होऊन त्यांच्या घरीही गेले आहेत.
तेल, मासे खाऊनच ‘ती’ जगली
मिºया येथून सुमित्राबाई जाधव हिला ताब्यात घेण्यात आले होते. ती लातूर जिल्ह्यातील शिंदाळा येथील राहणारी होती. नवरा गेल्याने तिला मानसिक धक्का बसला होता. सांगलीत देवदर्शनासाठी तिचे कुटुंब आले असता, ती बेपत्ता झाली होती. सन २०१७पासून ती बेपत्ता होती. अलावामध्ये महापुरूषाच्या मंदिरातील कच्चे तेल पिऊन आणि मिºया येथे कापून टाकलेले माशाचे तुकडे खाऊन ती जगत होती. तिच्यावर उपचार केल्यानंतर ती एका महिन्यातच बरी झाली. ती बी. ए. बीएड्. झालेली शिक्षिका होती. तिला नातेवाईकांच्या ताब्यातही देण्यात आले आहे.
दोन वर्ष बाजारात वावर
५ एप्रिल रोजी सकाळी आठवडा बाजारात गेली दोन वर्ष वावरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेला ताब्यात घेतले. महिला सभासदांनी या मनोरुग्ण महिलेला स्वच्छ आंघोळ, नवीन कपडे व खायला देऊन अधिक उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल केले.
गेली साडेचार वर्ष बेपत्ता
पुंडलिक शिंदे (वय २९) हा मूळचा पाटण - शिंदेवाडी येथील राहणारा होता. गेले साडेचार वर्ष तो बेपत्ता होता. त्याला साळवी स्टॉप येथून ताब्यात घेण्यात आले होते. तो आता बरा होऊन त्याच्या घरी गेला आहे.
वारीतून हरवला
गोरख पाटील (वय ३३) हा नाशिक येथील राहणार होता. तो वारीसाठी आला होता आणि वारीतच हरवला. त्याला रेल्वेस्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले होते. तोही बरा होऊन आपल्या घरी गेला आहे.
शौचालयच त्याचे घर
आठवडाभरापूर्वी चिपळूण बसस्थानकातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तो तेथीलच शौचालयात राहायचा आणि तेथेच त्याच खाणंपिणं असायचं. तो सातारा येथील असल्याचे कळले असून, लवकरच त्यालाही नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
एकालाही आजार नाही
आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या मनोरूग्णांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यातील एकालाही कोणताच आजार नसल्याचे पुढे आले आहे.
पुरस्कारापेक्षा पुनर्वसनासाठी पुढे या
राजरत्न प्रतिष्ठानने केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊ केले. मात्र, या पुरस्कारांपेक्षा मनोरूग्णांच्या पुनर्वसनासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन राजरत्न प्रतिष्ठानने केले आहे. मनोरूग्णांच्या पुनर्वसनासाठी कोणीच पुढे येत नसल्याची शोकांतिका आहे. प्रतिष्ठानच्या कार्याला सढळ हस्ते मदत केल्यास हे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास प्रतिष्ठानच्या पदाधिकाºयांना आहे.