डॉ.नंदिनी बाभूळकर यांना यंदाचा 'रत्नमाला घाळी पुरस्कार' जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 07:06 PM2024-02-13T19:06:07+5:302024-02-13T19:06:32+5:30
वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील कामगिरीचा होणार गौरव
गडहिंग्लज : गडहिंग्लजच्या सुकन्या व नागपूरस्थित प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदिनी सुश्रृत बाभूळकर यांना यंदाचा ‘रत्नमाला घाळी नारीशक्ती’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रविवारी (१८) दुपारी ३ वाजता येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात हा पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. घाळी म्हणाले, डॉ. बाभूळकर या विधानसभेचे दिवंगत माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या आहेत. नागपूर येथील सुश्रृत हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात दिलेले योगदान आणि कुपेकर यांच्या पश्चात माजी आ. संध्यादेवी कुपेकर यांच्या वाटचालीत दिलेली साथ, हलकर्णी-चंदगडच्या औद्योगिक वसाहतीमधील ‘एव्हीएच’ कंपनीच्या विरोधात मानवी आरोग्य व पर्यावरण रक्षणाच्या लढाईत दिलेले कृतीशील योगदान विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
विद्या प्रसारक मंडळ व जागृती माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रत्नमाला घाळी यांच्या स्मृती दिनी (१८ फेब्रुवारी) श्रीमंत मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. यावेळी माजी आ. संध्यादेवी कुपेकर, श्री बसवकिरण स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे सचिव अॅड बाबूराव भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक संगाप्पाण्णा दड्डी, ॲड. विकास पाटील, किशोर हंजी, डॉ. शिवकुमार कोल्हापुरे, महेश घाळी, प्राचार्य शिवानंद मस्ती आदी उपस्थित होते.
यापूर्वी यांचा झाला गौरव ..
यापूर्वी हेल्पर्स ऑफ दि हॅण्डकॅप संस्थेच्या नसिमा हुरजूक,वारणा समूहाच्या तत्कालीन अध्यक्षा शाेभाताई कोरे, देवदासी चळवळीतील कार्यकर्त्या डॉ. साधना झाडबुके यांचा या पुरस्काराने गौरव झाला आहे, असेही डॉ. घाळी यांनी सांगितले.