जहाज बुडताना पहिल्यांदा उंदीर उड्या मारतात, हसन मुश्रीफ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 02:36 PM2019-07-27T14:36:24+5:302019-07-27T14:54:40+5:30
आयुष्यभर शरद पवार यांच्या उपकाराखाली रहायचे, आमदार, मंत्री म्हणून पदे भोगायची आणि पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांना सोडून जायचे हे योग्य नाही
कोल्हापूर - आयुष्यभर शरद पवार यांच्या उपकाराखाली रहायचे, आमदार, मंत्री म्हणून पदे भोगायची आणि पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांना सोडून जायचे हे योग्य नसून जहाज बुडताना पहिल्यांदा उंदीर उड्या मारतात, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पक्षांतर करणा-या नेत्यांवर शरसंधान साधले. ‘दिस जातील, दिसत येतील भोग सरल, सुख येईल’ असे सांगत हाही बिकट कालावधीतून पक्ष उभारी घेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शुक्रवारी विधानसभेसाठी शासकीय विश्रामगृहात इच्छूकांच्या मुलाखती झाल्या, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, कॉँग्रेस, राष्ट्रवादी मधून नेते भाजप-शिवसेनेत उड्यात मारत आहेत, पण तिथे अगोदरच त्यांचे उमेदवार आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही.पक्ष असो की व्यक्ती प्रत्येकाचा काही कालावधी खराब असतो. पक्षाध्यक्ष शरद पवार हे ८० व्या वयातही महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांच्या उपकारामुळे अनेकांना आमदार, मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पक्षाची अवस्था वाईट असताना, या वयात पवार यांना सोडणे योग्य नाही. जहाज बुडू लागले की पहिल्यांदा भित्री उंदीरे उड्या मारतात. त्याप्रमाणे ही उंदीरे आणि सध्या पक्षांतर करणा-यांमध्ये फरक तरी काय? अशा काळात मुकाबला करायला हवा, राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यासाठी सज्ज असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.