राऊतवाडी शाळेस ‘माझी शाळा समृद्ध शाळे’चा बहुमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:06+5:302021-07-02T04:17:06+5:30
शित्तुर-वारूण : शित्तुर-वारूण (ता. शाहूवाडी) येथील जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर राऊतवाडी शाळेस शिक्षक व मुख्याध्यापकांचे कष्ट आणि त्याला लाभलेल्या ...
शित्तुर-वारूण : शित्तुर-वारूण (ता. शाहूवाडी) येथील जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर राऊतवाडी शाळेस शिक्षक व मुख्याध्यापकांचे कष्ट आणि त्याला लाभलेल्या लोकांच्या सहकार्यामुळे जे. पी. नाईक ‘माझी शाळा समृद्ध शाळा’ या अभियानाअंतर्गतचा कनिष्ठ स्तरावरील प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला.
सन २००२ मध्ये वस्तीशाळा म्हणून अस्तित्वात आलेली ही शाळा २००८ मध्ये जिल्हा परिषदेला वर्ग झाली. ग्रामस्थांच्या आर्थिक मदतीमुळे शाळेसाठी जागेची सोय करण्यात आली. त्या जागेवर दोन खोल्या, ऑफिस, टॉयलेट-बाथरूम, किचन शेड अशी इमारत बांधण्यात आली.
या द्विशिक्षकी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरत असून, दरवर्षी साधारण २५ इतके विद्यार्थी शिक्षण घेतात. समाजाप्रती प्रचंड तळमळ असलेले क्रियाशील मुख्याध्यापक सुरेश महिंदकर शाळेत विविध उपक्रम राबवितात. येथील ग्रामस्थांच्या लोकसहभागाची त्यांना सातत्याने जोड मिळते. या शाळेत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच सूर्यकांत राऊत यांच्याकडून सर्व शैक्षणिक साहित्य व वर्षातून एकदा शैक्षणिक सहलीचा आनंद लुटण्याची संधी मिळते. मांडवकर बंधूनी या शाळेचे डिजिटल पेंटिंग केले आहे. सूर्यकांत राऊत, तुषार राऊत, दिलीप राऊत, किशोर राऊत यांनी शाळेसाठी प्रिंटर, टेबल आदी साहित्यासाठी पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
शाळेत दरवर्षी गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने दहा ते पंधरा गावांतील सर्व विद्यार्थ्यांसाठी दक्ष प्रश्नमंजुषा हा उपक्रम राबविण्यात येतो. याशिवाय वृक्षारोपण, राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक हिताचे विविध उपक्रम राबविले जातात. लोकसहभागामुळेच सर्व गोष्टी शक्य होतात. - सुरेश महिंदकर, मुख्याध्यापक, वि. म. राऊतवाडी
फोटो : ०१ विद्या मंदिर राऊतवाडी