पर्यटकांसाठी आनंदवार्ता! राऊतवाडीचा धबधबा झाला प्रवाहित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:58 PM2022-06-29T12:58:35+5:302022-06-29T12:59:31+5:30
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला पंचावन्न किलोमीटर अंतरावर असणारा हा धबधबा दळणवळणासह सर्वच दृष्टीने प्रेक्षणीय असा आहे.
रमेश साबळे
कसबा तारळे : वर्षा ऋतूतील पर्यटनासाठी आकर्षक ठरलेला आणि अल्पावधीतच नावारूपास आलेला राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा दोन दिवसांपूर्वी प्रवाहित झाला. पावसाचे प्रमाण कमी असल्याने धबधब्याचा प्रवाहही कमी आहे. तरीही पर्यटकांनी पहिल्याच रविवारी धबधब्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला पंचावन्न किलोमीटर अंतरावर असणारा हा धबधबा दळणवळणासह सर्वच दृष्टीने प्रेक्षणीय असा आहे. साहजिकच वर्षा ऋतूतील पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची सर्वाधिक पसंती या धबधब्याला आहे. दीड दोनशे मीटरवरून कोसळणारे पाणी नयनरम्य असून, डोळ्यांची पारणे फेडतो. धबधब्याच्या खाली तसेच कोसळणाऱ्या जलधरांच्या मागील बाजूस उभे राहून जल तुषाराने न्हाऊन निघता येते, हे या धबधब्याचे खास वैशिष्ट्य आहे.
धबधब्याच्या परिसरात स्थानिक तसेच बाहेरील व्यावसायिकांनी हॉटेल, चहा नाश्ता सेंटर, उकडलेले कणीस, भुईमुगाच्या शेंगा स्टॉल थाटल्याने पर्यटकांना जेवण व नाश्त्याची सोय झाली आहे. दूरवरून आलेल्या पर्यटकांसाठी धबधबा परिसरापासून जवळच तसेच राधानगरीत यात्री निवास व लॉजिंग सुविधा उपलब्ध करून राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
गेली दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. पावसाळी पर्यटन ही त्यासाठी अपवाद नव्हते. परिणामी, राऊतवाडी धबधब्याकडे पर्यटकांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे शनिवारी, रविवारी येणाऱ्या पर्यटकांमुळे जेवण, चहा, नाश्ता यासह इतर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले होते. मात्र, यावर्षी धबधबा प्रवाहित झाल्यापासून सर्वच व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत.