‘रवळनाथ’ने मानवतेचा नंदादीप तेवत ठेवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:34+5:302021-07-23T04:16:34+5:30
गडहिंग्लज : केवळ आर्थिक नफ्याचाच विचार न करता शैक्षणिक व सामाजिक कामातून ‘रवळनाथ’ने सामाजिक उत्तरदायित्व निभावले असून मानवतेचा नंदादीप ...
गडहिंग्लज :
केवळ आर्थिक नफ्याचाच विचार न करता शैक्षणिक व सामाजिक कामातून ‘रवळनाथ’ने सामाजिक उत्तरदायित्व निभावले असून मानवतेचा नंदादीप सतत तेवत ठेवला, असे गौरवोद्गार संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी काढले.
श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे भुकेले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार झाला, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.
भुकेले म्हणाले, वक्तृत्वाच्या क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांकडे तुच्छतेने बघण्याचा दृष्टिकोन पुसून काढण्यात यशस्वी झालो. विद्यार्थीदशेपासूनच मिळालेल्या प्रबोधनाचा वसा आणि वारसा अंत:करणापासून जपला. सामाजिक परिवर्तनाचे प्रवाह जिवंत ठेवण्यासाठी झटत राहणार आहे.
चौगुले म्हणाले, समाजातील ज्ञान आणि गुणिजनांचा सन्मान व आपद्ग्रस्तांना आधार देण्याचे काम कर्तव्य भावनेतून करीत राहिल्यामुळेच ‘रवळनाथ’ जनमानसात रुजण्यासाठी मदत झाली.
याप्रसंगी भुकेले यांचा चौगुले यांच्या हस्ते तर स्नेहा भुकेले यांचा मीना रिंगणे यांच्या हस्ते सत्कार झाला.
कार्यक्रमास शाखाधिकारी अशोक सुळकुडे, सीईओ डी. के. मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, सागर माने, प्राचार्य आर. एस. निळपणकर, किरण पोतदार, विजय आरबोळे, महेश मजती, उमा तोरगल्ली, रेखा पोतदार, बाबासाहेब मार्तंड, दत्ता पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष वासुदेव मायदेव यांनी आभार मानले.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे शिवाजीराव भुकेले यांचा एम. एल. चौगुले यांच्या हस्ते तर स्नेहा भुकेले यांचा मीना रिंगणे यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी वासुदेव मायदेव, आर. एस. निळपणकर, दत्ता पाटील, डी. के. मायदेव, उमा तोरगल्ली, महेश मजती आदी उपस्थित होते.
क्रमांक : २२०७२०२१-गड-०३