दुर्वास कदमांच्या अर्जावरून उठले रान

By admin | Published: October 1, 2014 01:15 AM2014-10-01T01:15:53+5:302014-10-01T01:17:40+5:30

‘दक्षिण’चे राजकारण : अर्ज वैध ठरल्याची सूत्रांची माहिती

Ravan woke up from the application of Dravas Kadam | दुर्वास कदमांच्या अर्जावरून उठले रान

दुर्वास कदमांच्या अर्जावरून उठले रान

Next

कोल्हापूर : ‘दक्षिण’ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दुर्वास कदम यांचा अर्ज काल, सोमवारी छाननीत बाद ठरल्याने खळबळ उडाली होती. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच माझा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचा आरोप केला. भाजपशी घरोबा करणाऱ्या या खासदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही कदम यांनी केली. दोन आॅक्टोबरला ‘दक्षिण’मधील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचेही कदम यांनी सांगितले. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून दुर्वास कदम यांचा अर्ज वैध ठरल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे दुर्वास कदम यांच्या अर्जावरुन ‘दक्षिण’चे राजकारण पुन्हा तापले आहे.
पत्रकार परिषदेत कदम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ, महाडिक व जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांनी मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी धनंजय महाडिक यांनी आपण लागेल ती मदत करू अशी ग्वाही दिली. त्यामुळे माझा अर्ज भरण्यासाठी तज्ज्ञांची मदत मिळावी म्हणून मी खासदार महाडिक यांच्याशी वारंवार संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून काहीच मदत झाली नाही. फॉर्म भरल्यानंतर तज्ज्ञांमार्फत त्यातील त्रुटी तपासून, त्या दुरुस्त करून घेऊन वेळ पडल्यास कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करणे गरजेचे होते; पण असे काहीच घडले नाही. त्यामुळे माझा अर्ज छाननीत बाद व्हावा अशीच पक्षाच्या नेत्यांची इच्छा होती की काय, अशी शंका येते. सगळ््या घटना तशाच घडल्या आहेत.
कदम म्हणाले, ‘दक्षिण’मधून धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू भाजपचा झेंडा घेऊन रिंंगणात आहेत. ज्या राष्ट्रवादीने खासदार महाडिक यांना संसदेच्या दारापर्यंत नेले, त्यांच्या पत्नी अरुंधती महाडिक उघडपणे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. ‘उत्तर’मध्ये त्यांच्या जवळचे कार्यकर्ते कॉँग्रेसचा प्रचार करीत आहेत. हे वातावरण पक्षाला पोषक आहे का? खासदार महाडिक यांना भाजपशी घरोबा करावयाचा असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. एकीकडे राष्ट्रवादीचा खासदार म्हणून मिरवायचे आणि दुसरीकडे युवाशक्तीची ढाल करून भाजपची प्रचार यंत्रणा राबवायची, असा दुहेरी डाव करणाऱ्यांबाबत राष्ट्रवादीने गांभीर्याने विचार करावा. यावेळी आविष्कार कुराडे, जितेंद्र शिंदे, साताप्पा कांबळे, नितीन माळी, सुरेश पिसाळ, आदी उपस्थित होते.
दुर्वास कदम यांचा अर्ज वैध
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दुर्वास कदम यांचा अर्ज वैध झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्य निवडणूक आयोगाकडून उद्या, बुधवारी त्यासंदर्भात अधिकृत आदेश येण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात काही आदेश झाला आहे, तो नक्की काय आहे हे उद्या पाहून त्यानुसारच निर्णय घेऊ, असे या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केले. कदम यांनी उमेदवारी अर्जात ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’ असा उल्लेख केल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यासंबंधीची दखल पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. आज, मंगळवारी सकाळी माजी मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांनी तातडीने राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांना याचिका दाखल करण्यासाठी पाठविले. पक्षाध्यक्ष शरद पवार व ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्वत: लक्ष घालून महत्त्वाच्या सूचना दिल्या. ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी’ला प्रादेशिक भाषेत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’ असे म्हटले जाते, असे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. उद्या यासंबंधीचा आदेश येईल. कदम यांच्याबाबत पक्षाने काहीच केले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे, असे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. कदम यांनी मात्र कालच आपला अर्ज आता वैध ठरला तरी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ते कोणता निर्णय घेतात, हे महत्त्वाचे आहे. त्यांचा अर्ज बाद ठरल्याने डमी उमेदवार बाबा सरकवास यांना पक्षाने काल उमेदवारी दिली होती; परंतु कदम यांना पक्षाने पहिला ‘ए’ ‘बी’ फॉर्म दिल्याने त्यांचीच उमेदवारी अधिकृत मानण्यात येईल.(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी संपविण्याचा विडा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष अडचणीत असताना झालेल्या घडामोडींवरून एकही राष्ट्रवादीचा नेता गंभीर नसल्याचे स्पष्ट होते. एकंदरीत निवडणुकीतील वातावरण पाहता महाडिक कुटुंबाने कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी संपविण्याचा विडा उचलला की काय? अशी शंका येत असल्याचेही दुर्वास कदम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Web Title: Ravan woke up from the application of Dravas Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.