भंगाराचं ‘सोनं’ करणारा रवी!

By admin | Published: August 21, 2016 12:06 AM2016-08-21T00:06:20+5:302016-08-21T00:07:22+5:30

- अवलीया

Ravi, who smells like a 'gold'! | भंगाराचं ‘सोनं’ करणारा रवी!

भंगाराचं ‘सोनं’ करणारा रवी!

Next

व्यवसायानं तो आहे एक गॅरेजवाला. कोल्हापूर- पाचगाव रस्त्यावरच्या तिवले कॉलनीत त्याचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय सध्या चांगला चाललाय. कोणत्याही कंपनीच्या दुचाकीची दुरुस्ती तो अगदी लीलया करतो. फावल्या वेळात जुन्या, पान्या अगदी भंगार झालेल्या गाड्या तो मिळेल त्या किमतीला खरेदी करतो. वेगवेगळ््या भंगार गाड्यांचे एक, एक चांगले पार्ट बाजूला काढून ठेवतो आणि या जमवलेल्या स्पेअर पार्टमधून सुरू होते नवनिर्मिती.
रवींद्र नानासो कांडेकरी नावाच्या या अवलियाने अवघ्या दोन अडीच फूट उंचीच्या अगदी लहान मुलांना चालवता येतील अशा दुचाकी आणि चारचाकी गाड्या बनविल्या आहेत. ही सर्व वाहने पेट्रोलवर चालतात. एक छंद म्हणून ही सर्व वाहने त्याने जतन करून ठेवली आहेत. अनेकजण त्याच्याकडे ही वाहने विकत मागतात. पण कुणालाही तो ती विकत नाही. कधी त्याचा मुलगा, तर कधी तो स्वत:ही या वाहनांवरून कौतुकाने रपेट मारतात. दोन, अडीच फूट उंचीची दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरून धावताना पाहून अनेकांना या गोष्टीचे नवल वाटते. जाणाऱ्या-येणाऱ्या अनेकांना त्याची ही शान की सवारी कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरता येत नाही. त्याच्या परिसरात राहणाऱ्या अनेक छोट्या मुलांनाही तो कौतुकाने या वाहनांची सफर घडवतो. मुलांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं की केलेल्या कष्टाच चीज झाल्यासारखं वाटतं असं रवी म्हणतो.
रवींद्रचे वडील सुतारकाम करायचे. त्यांना मुलं तीन. पाच माणसांच्या संसाराचा गाडा त्यांच्या सुतारकामातून मिळणाऱ्या मिळकतीत कसाबसा ते चालवायचे. घरची परिस्थिती पाहून त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. धाकटा रवी हे सगळं पहात होता. वडिलांना मदत व्हावी म्हणून अवघ्या १८व्या वर्षी तो उद्यमनगरातल्या बाबूराव जानकरांच्या आॅटो गॅरेजमध्ये कामाला जाऊ लागला. सुरुवातीला गाड्या पुसणे, मेस्त्रींना काम करताना मदत करणे, अशी किरकोळ कामे तो करायचा. इथले मेस्त्री कसे काम करतात, गाड्या कशा खोलतात, हे तो अगदी मनापासून पहायचा. संधी मिळाली की स्वत: एखादी गाडी खोलायचा. नेमका बिघाड कुठं आहे याचा विचार करायचा. त्याची कामावरची निष्ठा पाहून गॅरेजचे मालक जानकर मेस्त्री त्याच्यावर अगदी खूश होते. इथं जवळपास तीन वर्षे त्यानं काढली. याकाळात दुरुस्तीचं बरचसं काम तो शिकला.
एक दिवस शाहूपुरीतल्या धनंजय अस्वले यांच्या मोटोक्लिनीक नावाच्या गॅरेजमध्ये मेस्त्रीची एक जागा खाली असल्याची माहिती त्याला कुणाकडून तरी समजली. रवीचं काम पाहून अस्वले मेस्त्रींनी त्याला तत्काळ कामावर ठेवून घेतले. इथं मेस्त्री म्हणून तो स्वतंत्रपणे काम करू लागला. या गॅरेजमध्ये अनेक जुन्या, पान्या स्कूटर, मोटारसायकल, लुना पडून होत्या. या गाड्यांचे चांगले स्पेअर पार्ट वापरून एकादं वेगळं वाहन बनवायची कल्पना त्याला इथेच सुचली. बरोबरच्या सहकाऱ्यांनी सुरुवातीला त्याला अगदी खुळ््यात काढलं. पण, अस्वले मेस्त्रींनी परवानगी देताच त्यानं कामाला सुरुवात केली. जुन्या लुनाचं इंजिन, सनी गाडीच्या टायर आणि पाईपची चेस वापरून त्यानं एक छोटी दुचाकी बनवली. ही गाडी बनवताना वेल्डिंग, टर्निंग यासारखी काम करण्यासाठी तो त्याच्या चुलत्यांच्या कागलमधील गॅरेजमध्ये जायचा. आपण बनवलेली गाडी जेव्हा रस्त्यावरून धावू लागली तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अस्वले मेस्त्रींच्या गॅरेजमध्ये त्याने सात वर्षे काम केले.
२00२ साली पाचगाव रोडवरच्या तिवले कॉलनीत भाड्याच्या जागेत त्याने गॅरेज सुरू केले. दोनच वर्षांत त्याने स्वत:च्या १६00 स्क्वेअर फुटांच्या जागेत शांती अ‍ॅटो क्लिनिक स्थलांतरित केले. आता त्याचा व्यवसायात चांगला जम बसला आहे.
जुन्या गाड्यांचे स्पेअरपार्ट वापरून पूर्वी एक गाडी यशस्वीरीत्या बनविल्याचा अनुभव गाठीशी असल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला आणि यानंतर मात्र त्याने अजिबात मागे वळून पाहिले नाही. भंगार मटेरिअल वापरून त्याने अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्या बनविल्या. या गाड्यांची माहिती कळताच अनेक हौशी लोक त्याच्याकडे या गाड्या विकत मागतात, पण एकही गाडी अद्याप त्याने विकलेली नाही. अगदी पोटच्या पोराप्रमाणे या गाड्यांवर त्याचे प्रेम आहे. ऐपत नसतानाही पदरमोड करून हजारो रुपयांची गुंतवणूक त्याने या वाहनांमध्ये केलेली आहे. खरोखरच या छंदवेड्या माणसाच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
- मुरलीधर कुलकर्णी, कोल्हापूर.

अनोखी स्पर्धा जिंकली
टीव्हीएस स्टार सिटीतर्फे २00६ साली हौशी मोटारसायकलचालकांसाठी एक अनोखी स्पर्धा घेण्यात आली. जास्तीत जास्त लोकांना दुचाकीवर बसवून जास्तीत जास्त अंतर पूर्ण करायचे, असे या स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत १२ लोकांना दुचाकीवर घेऊन संजयने दोन किलोमीटरचे अंतर लीलया पूर्ण केले. अन् उपस्थितांची वाहवा मिळवीत, ही स्पर्धा जिंकली.
जोतिबा यात्रेसाठी फ्री सर्व्हिस
गेली १७ वर्षे जोतिबा यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरुंची वाहने संजय स्वखर्चाने दुरुस्त करून देतो. हे काम करताना रात्रीच्या वेळी प्रकाशाची सोय व्हावी म्हणून जुन्या होंडा स्ट्रीट गाडीचे इंजिन वापरून त्याने एक जनरेटर कम एअर कॉम्प्रेसरही बनविला आहे.
मित्रांबद्दल कृतज्ञता
जुन्या गाड्यांच्या स्पेअर पार्टपासून छोट्या दुचाकी तसेच चार चाकी गाड्या बनविताना संजयला त्याच्या मदन सुतार, संजय पाटणकर या मित्रांनी खूप सहकार्य केले. त्यांच्याबद्दलची तसेच एकेकाळी ज्यांच्या गॅरेजमध्ये नोकरी केली त्या धनंजय अस्वले यांच्याबद्दल तो नेहमी कृतज्ञता बोलून दाखवतो.

Web Title: Ravi, who smells like a 'gold'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.