रविकांत तुपकर यांचा ‘स्वाभिमानी’शी संबंध संपला; प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 12:54 PM2024-07-23T12:54:23+5:302024-07-23T12:56:06+5:30
काही मतमतांतरे असतील तर चर्चेतून मार्ग निघाला असता; पण..
कोल्हापूर : रविकांत तुपकर हे गेली चार वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेसह दोन राज्य कार्यकारिणीच्या बैठकींना हजर राहिले नाहीत. याउलट ते संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका करीत आहेत. चळवळीचे नुकसान होऊ नये म्हणून आतापर्यंत खूप सहन केले. यापुढे स्वाभिमानी संघटना व पक्षाशी तुपकर यांचा संबंध नाही. त्यांचे संघटनेतील योगदान पाहता, त्यांना काढून टाकले हा शब्द आपण वापरणार नाही, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गेली २२ वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली राजू शेट्टी लढत आहेत. स्वर्गीय शरद जोशी यांच्यानंतर कष्टकऱ्यांना आपले वाटणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र पाहतो; पण, रविकांत तुपकर हे सातत्याने राजू शेट्टी यांच्यावर टीका करीत आहेत. ‘स्वाभिमानी’ संघटना हा परिवार आहे, यामध्ये काही मतमतांतरे असतील तर चर्चेतून मार्ग निघाला असता; पण, तुपकर सोशल मीडियातून सातत्याने चळवळीला हानिकारक वक्तव्य करीत आहेत.
आता तर ते पुण्यात बैठक घेऊन स्वतंत्र सुभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण, २६ सप्टेंबर २०१९लाच तुपकर यांनी स्वाभिमानी पक्ष व संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे, तरीही त्यांना राज्य कार्यकारिणीसाठी स्वतंत्रपणे निमंत्रण दिले होते, ते आलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा ‘स्वाभिमानी’शी काही संबंध नाही.
अडीच लाख मतांनी हुरळून जाऊ नका
रविकांत तुपकर हे लोकसभेला बुलढाण्यातून लढले. त्यांनी मदतीसाठी राजू शेट्टींना फोन केल्यानंतर कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत राहण्यास सांगितले. त्यांना अडीच लाख मते मिळाली, याचा अभिमान आम्हाला आहे, म्हणून त्यांनी हुरळून जाऊ नये, असा सल्लाही प्रा. पाटील यांनी दिला.