रविकांत तुपकरांचे राजू शेट्टी यांना दहा पानी पत्र, नेतृत्वावरील आक्षेपांची नोंद, निर्णय समितीच्या कोर्टात
By भीमगोंड देसाई | Published: August 16, 2023 09:51 PM2023-08-16T21:51:32+5:302023-08-16T21:51:47+5:30
Ravikant Tupkar:
- भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीच्या सूचनेनुसार मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना दहा पानी पत्र पाठवले आहे. हे पत्र माजी खासदार शेट्टी यांना मिळाले असून, त्यांनी ते समितीकडे दिले आहे. पत्रावर समितीला लेखी म्हणणे देणे आणि प्रसंगी हजर राहून तुपकरांनी घेतलेल्या आक्षेपांवर खुलासा करण्याची भूमिकाही शेट्टी यांनी घेतली आहे.
तुपकरांनी प्रसारमाध्यमांतून नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्य पातळीवरील संघटनेच्या शिस्तपालन समितीने तुपकरांना हजर राहून बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांना समितीने १५ ऑगस्टपर्यंत हजर राहून म्हणणे मांडण्याची मुदत दिली होती; पण त्यांनी हजर राहून म्हणणे मांडण्याऐवजी थेट शेट्टी यांनाच पत्र पाठवून भूमिका मांडली आहे. तुपकरांनी दिलेल्या पत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या काळातील घडामोडी, संघटनेची विविध आंदोलने, दाखल झालेले शेकडो गुन्हे, पोलिसांचा लाठीमार, तडीपारी, तुरुंगवास यांचा उल्लेख केला आहे.
तुपकरांचे पत्र समितीकडे पाठवले आहे. पत्रात संघटनेचे कार्य, आंदोलनातील दाखल झालेले गुन्हे, पदाधिकाऱ्यांतील वादांचा उल्लेख आहे. या पत्रावर माझाही खुलासा समितीकडे देणार आहे. समितीने बोलवले तर हजर राहणार आहे.
-राजू शेट्टी, संस्थापक-अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना