गोकुळ उत्पादन विक्री ठेक्याचा आरोप खोटा, बिनबुडाचा : रवींद्र आपटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 10:27 AM2019-12-11T10:27:40+5:302019-12-11T10:29:51+5:30
कोल्हापूर : पुणे येथील गोकुळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा ठेका एकाच व्यक्तीला दिला आहे, हा आरोप धादांत खोटा ...
कोल्हापूर : पुणे येथील गोकुळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा ठेका एकाच व्यक्तीला दिला आहे, हा आरोप धादांत खोटा आणि बिनबुडाचा आहे, असा खुलासा ‘गोकुळ’चे चेअरमन रवींद्र आपटे यांनी केला आहे. विरोधकांनी ‘गोकुळ’सारख्या संस्थेवर बोलताना किमान माहिती घेऊन बोलावे, असा टोलाही त्यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे.
चार दिवसांपूर्वी कोल्हापुरात झालेल्या एका बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’चे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी हप्ते दिल्यासारखा पुण्यातील एकाच कंपनीकडे ठेका का दिला आहे, असा आरोप केला होता. यावर मंगळवारी ‘गोकुळ’तर्फे निवेदन प्रसिद्धीस देऊन या आरोपांना उत्तर देण्यात आले.
चेअरमन रवींद्र आपटे यांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, पुणे शहर व विभागाकडे ‘गोकुळ’चे दररोज सरासरी दोन लाख ३० हजार लिटर दूध आणि महिन्याला साधारणपणे ३२ टन दुग्धजन्य पदार्थांची विक्री होते. यासाठी गेली अनेक वर्षे पुणे विभागात दुधासाठी १० वितरक आणि दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीसाठी चार सुपर स्टॉकिस्ट आणि २९ वितरक आणि त्यांच्या माध्यमातून शेकडो किरकोळ विक्रेत्यांचे जाळे कार्यरत आहे. यामध्ये दिवसेंदिवस नवीन वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांची भर पडत आहे.
कोणताही दूध संघ हा गुणवत्ता टिकविण्यासाठी आणि सुलभ वितरण व्यवस्था याकरिता मध्यवर्ती आणि एकच पॅकेज युनिट निर्माण करतो. गेली अनेक वर्षे पुण्याची विक्री अगदी पाच-सात हजार असल्यापासून ‘गोकुळ’चेही पॅकेजिंग युनिट एकच आहे.
हळूहळू विक्री वाढेल त्याप्रमाणे पॅकेजिंग युनिटचा विस्तार वाढत गेला आहे. मात्र विक्रीसाठी गेल्या अनेक वर्षांत अनेक वितरकांच्या माध्यमातून स्वतंत्र आणि विस्तृत यंत्रणा दूध संघाने उभी केली आहे. याची सर्व माहिती संघाच्या मार्केटिंग विभागाकडे केव्हाही उपलब्ध होऊ शकते, असेही आपटे यांनी स्पष्ट केले आहे. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण विरोधकांनी ‘गोकुळ’सारख्या संस्थेविषयी बोलताना किमान माहिती घेऊन बोलणे अपेक्षित आहे, असा टोलाही आपटे यांनी लगावला आहे.
विरोधकांकडून काल्पनिक माहितीच्या आधारावर आरोप
संघाने कोणत्याही एका व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे ‘गोकुळ’च्या उत्पादन, विक्रीचा ठेका दिलेला नाही. फक्त राजकीय हेतूने, निव्वळ खोटे आरोप करायचे म्हणून विरोधक पत्रकार परिषद घेऊन काल्पनिक माहिती देऊन दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांमध्ये संघाविषयी गैरसमज निर्माण करीत आहेत, असा आरोपही आपटे यांनी केला.