‘गोकुळ’ अध्यक्ष पदी रविंद्र आपटेच, बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:18 PM2019-01-14T18:18:56+5:302019-01-14T18:20:13+5:30
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे रविंद्र पांडूरंग आपटे (उत्तूर, ता. आजरा) यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. संघाच्या गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्प कार्यालयात झालेल्या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहायक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख होते. आपटे यांनी यापुर्वी २००८ ते २०१० या कालावधीत अध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले असून ते ‘गोकुळ’चे बारावे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे रविंद्र पांडूरंग आपटे (उत्तूर, ता. आजरा) यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. संघाच्या गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्प कार्यालयात झालेल्या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहायक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख होते. आपटे यांनी यापुर्वी २००८ ते २०१० या कालावधीत अध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले असून ते ‘गोकुळ’चे बारावे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले.
विश्वास पाटील यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदी आपटे यांची निवड करण्यात आली. आपटे यांचे नाव मावळते अध्यक्ष विश्वास नायायण पाटील यांनी सूचविले त्यास ज्येष्ठ संचालक रणजीतसिंह पाटील यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष पदासाठी अरूण डोंगळे व धैर्यशील देसाई यांनी शेवटपर्यंत निकराचे प्रयत्न केले. आपटे यांचे नाव रात्रीच नेत्यांनी निश्चित केले होते.
सोमवारी सकाळी दहा वाजता महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी अध्यक्षांचे नाव असलेले बंद पाकीट अध्यक्षांचे स्वीय सहायक संजय दिंडे यांच्या मार्फत ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांच्याकडे दिले. त्यांनीच सभेत अध्यक्ष पदाचे नाव वाचून दाखवल्यानंतर रविंद्र आपटे यांनी सभाध्यक्ष डॉ. देशमुख यांच्याकडे अर्ज दाखल केला आणि मुदतीत एकच अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे देशमुख यांनी जाहीर केले. डॉ. देशमुख यांच्या हस्ते आपटे यांचा सत्कार करण्यात आला. आपटे समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष केला.
वीस लाख लिटर दूध संकलनाचे उदिष्ट आणि वाढणारे गायीच्या दूधाबाबत सर्वच संचालकांनी चिंता व्यक्त करत गाय दूधाची विक्री व्यवस्था सक्षम करा. औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, धूळे आदी ठिकाणी गाय दूध विक्रीचे सेंटर सुरू करण्याची सूचना केली.
नूतन अध्यक्ष रविंद्र आपटे म्हणाले, नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत संघासमोरील आव्हाने निश्चित पेलू. गायीच्या अतिरिक्त दूध विविध नामवंत चॉकलेट, बिस्कीटसह इतर कंपन्याच्या उपपदार्ध तयार करण्यासाठी वापरण्याचा मनोदय आहे. मल्टीस्टेटला मंजूरी घेऊन संचालक मंडळांना सोबत घेऊन नव्या दमाने काम करू. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी आभार मानले.
नरकेंना चुयेकरांची आठवण
दहा संचालकांनी आपली मनोगते व्यक्त करत दूध व्यवसायासमोरील अडचणी विशद केल्या, पण अरूण नरके वगळता एकानेही संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
कॅशलेशमुळे १२ कोटी अडकले
दूध उत्पादकांची बिले बॅँकेत जमा केली तरच सरकारकडून पावडर निर्मितीसाठी वापरलेल्या दूधाला प्रतिलिटर ५ रूपये अनुदान मिळणार आहे. सुरूवातीच्या टप्यात कॅशलेससाठी जोरदार प्रयत्न केले, पण हा गोंधळ सुरू झाल्यापासून त्याकडे दुर्लक्ष झाल्याने १२ कोटी अडकल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले.