राऊतवाडी धबधबा विकासाचा कच्चा आराखडा
By admin | Published: October 4, 2016 12:16 AM2016-10-04T00:16:16+5:302016-10-04T00:59:43+5:30
धबधब्यावरील आनंद लुटल्यानंतर कारिवडे मार्गे व्हाया दाजीपूर अभयारण्याचे भ्रमण करून निसर्गाचा आनंद घेत प्राण्यांना न्याहाळता येईल.
सोळांकूर : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राधानगरी वन्यजीव विभाग व स्थानिक वन समित्या यांच्या पुढाकाराने राऊतवाडी धबधब्यावर मनोरे, पार्किंग झोन, बालोद्योन, हॉटेल्स, चेजिंग रूम, प्रसाधनगृहे उभा करण्यासाठी धबधब्याचा पर्यावरणपूरक कच्चा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पर्यटकांना धबधब्यासह हत्तीमहल, बेनजीर व्हिला, दाजीपूर, अभयारण्य, हसणे प्रकल्पावरील बोटिंगचा लवकरच आनंद लुटता येणार आहे. गेल्या चार वर्षांत राऊतवाडी, रामणवाडी, सोळांकूर येथील धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. राऊतवाडी धबधब्यानजीक जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. आराखड्यानुसार मुख्य रस्ता चांगला करून धबधब्यावरील मार्ग, सिमेंट पायऱ्या, छोटेसे तळे बनवून धबधब्यावरील कडा पाहण्यासाठी उंच मनोरे उभे केले जाणार आहेत. पाण्याचा आनंद लुटल्यानंतर स्त्री-पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र चेजिंग रूम, पार्किंग झोन, प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बालोद्यान, छोटासा बगीचा देखील बनविण्याची संकल्पनेचा आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.सध्या हत्तीमहल व बेनजीर व्हिला या ऐतिहासिक वास्तू पाटबंधारे विभागाकडे आहेत. त्या वस्तू वनविभागाकडे देण्यात याव्यात, अशी मागणी संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे. धबधब्यावरील आनंद लुटल्यानंतर कारिवडे मार्गे व्हाया दाजीपूर अभयारण्याचे भ्रमण करून निसर्गाचा आनंद घेत प्राण्यांना न्याहाळता येईल. त्यानंतर पर्यटकांना हसणे प्रकल्पाकडे बोटिंग प्रवास व स्विमिंगचा आनंद लुटता येणार आहे. ठिकठिकाणी हॉटेल्स्, रेस्टॉरंट, निवासस्थाने उभी करण्याची संकल्पना आराखड्यामध्ये नमूद करण्यात आली आहे.
लवकरच राऊतवाडी धबधब्याचा नवा लूक पाहण्याची उत्कंठा पर्यटक व पर्यावरणप्रेमींना लागली आहे. हा विकास पूर्णपणे पर्यावरणपूरक असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनीही सहभाग दर्शवावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत. (वार्ताहर)