भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:33 AM2019-05-13T11:33:23+5:302019-05-13T11:36:17+5:30
अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
कोल्हापूर : अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे हिंदीतील प्रसिद्ध कांदबरीकार संजीव यांच्या फाँस या कादंबरीचे बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या मराठीतील अनुवादीत ‘फास’ या कांदबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे होते.
महावीर महाविद्यालयातील अॅम्पी थिएटरमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य, भाजी स्वस्तात मिळावी ही अपेक्षा करणं यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. शेतकऱ्यांनी काय करायचे हे तो ठरवू शकत नाही. ते अन्य जण ठरवतात. ही फार मोठी शोकांतिका असून, तो या चक्रव्यूहामध्ये अडकला आहे.
शेतकरी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, मात्र साहित्य क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न क्वचितच मांडले जातात. अशा परिस्थितीमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन होणे हे कौतुकास्पद आहे. कृष्णात खोत म्हणाले, कोणत्याही लेखकाला भाषा, प्रांत यांचे बंधन नसते. साहित्य हे व्यवस्थेविषयीचा राग व्यक्त करत असते.
नामदेव माळी म्हणाले, फास ही अनुवादित कादंबरी शेतकऱ्यांच्या फासापुरतीच सीमित राहत नाही, तर समाजातील जातिव्यवस्था, विसंगत परिस्थितीवरही भाष्य करते. लेखक बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, लेखक बाळासाहेब पाटील, भाग्यश्री कासोटी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. आभार डॉ. विनोद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संस्कृतीचा घटक
सध्या दुष्काळामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तशीच परिस्थिती भविष्यात अन्नासाठी करावी लागेल. अशी संहारक परिस्थिती निर्माण व्हायची नसेल, तर आज शेतकऱ्याला सर्वांनी मिळून जगविण्याची गरज आहे. शेतकरी हा संस्कृतीचा घटक मानला गेला तर त्याचे अनेक प्रश्न सामूहिकरीत्या सोडवता येतील.