जुन्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार
By admin | Published: May 31, 2017 09:52 PM2017-05-31T21:52:57+5:302017-05-31T21:52:57+5:30
जिल्हा बँकांना झटका : २७० कोटींच्या नोटांचे करायचे काय?
कोल्हापूर : नोटाबंदीच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला. याबाबतचा अध्यादेश रिझर्व्ह बँकेने बुधवारी काढला आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांत गेली सहा महिने पडून असलेले हजारो कोटी रुपयांचे करायचे काय, असा प्रश्न बँकांसमोर आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेत तब्बल २७० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आहेत. रिझर्व्ह बँकेने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला घेतला होता. तीन दिवसांत जिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने जुन्या नोटा स्वीकारल्या होत्या. राज्यभरातील जिल्हा बँकांना सुमारे साडेसहा हजार कोटींच्या नोटा जमा झाल्या होत्या; पण या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने टाळाटाळ केली होती. या नोटाबाबत ‘नाबार्ड’ने दोनवेळा तपासणी केली तरीही रिझर्व्ह बँकेकडून नोटा स्वीकारण्याच्या कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदी काळात जमा झालेल्या जुन्या नोटांच्या खात्यांची केवायसी तपासणीचे आदेश दिले. केवायसी पूर्तता असेल तर नोटा स्वीकारण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेला दिले होते. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने ‘नाबार्ड’च्या माध्यमातून तिसऱ्यांदा तपासणी केली. त्यामध्ये राज्यातील बहुतांशी जिल्हा बँकांची १०० टक्के केवायसी पूर्तता झालेले निदर्शनास आले. त्यामुळे नोटा स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला होता पण तपासणी करून महिना उलटला तरी अद्याप नोटा स्वीकारण्यास काहीच हालचाली दिसत नसल्याने जिल्हा बँकांचे प्रशासन हवालदिल झाले आहे. हजारो कोटींच्या नोटा सहा महिने पडून असल्याने कोट्यवधी रुपयांचा व्याजाचा भुर्दंड बँकांना बसला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना अडचणी येत आहेत. तोपर्यंत रिझर्व्ह बँकेने या नोटा स्वीकारणार नाहीच, असा फतवा काढल्याने जिल्हा बँकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेत २७० कोटी रुपये पडून असल्याने बँकेला दरमहा ४७ कोटींचा फटका बसत आहे. त्यात सध्या शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज देण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यात रिझर्व्ह बँकेने असा निर्णय घेतल्याने बॅँकेचे कंबरडे मोडणार आहे.
पुण्यासह चार बँकांत सर्वाधिक रक्कम नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकांत ५०० व १००० रुपयांच्या सर्वाधिक नोटा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा झाल्या. नाशिक, सांगलीपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बँकेतही मोठी रक्कम जमा झाली. ‘केवायसी’ची पूर्तता झाल्यानंतर जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, असे रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. जर रिझर्व्ह बँकेने नोटा न स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर जिल्हा बँका उद्ध्वस्त होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्ज देताना अडचण येणार आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेविरोधात अवमान याचिका दाखल करावी लागेल. - आमदार हसन मुश्रीफ (अध्यक्ष, जिल्हा बँक)