‘आर.सी.’ गँगला आणले ताळ्यावर
By admin | Published: January 30, 2015 12:00 AM2015-01-30T00:00:45+5:302015-01-30T00:16:36+5:30
पोलिसी खाक्या : हात जोडून मागितली माफी; दहाजणांची टोळी
कोल्हापूर : खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ‘आर. सी.’ गँगच्या दहाजणांच्या टोळीला आज, गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयात बोलावून घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी खाकीचा प्रसाद दाखवीत चांगलेच ताळ्यावर आणले. एरव्ही रुबाबात वावरणारे आरसी गँगचे संशयित रवी शिंदे, योगेश पाटील, रणजित कांबळे, प्रकाश कांबळे, संदीप गायकवाड, जावेद सय्यद, श्रीकांत तेलवेकर, आकाश कदम, साई लाखे, रमेश पाटील हे गुडघ्यावर बसून, हात जोडून ‘आम्ही पुन्हा गुन्हेगारी करणार नाही,’ अशी विनवणी यावेळी करीत होते. जवाहरनगर परिसरातील आरसी गँगच्या टोळीचा शहरात सुपारी घेऊन खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार करणे, घरफोडीसारख्या गुन्ह्यांत सहभाग वाढू लागला आहे. टोळीवर्चस्व मोडीत काढण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी घेतला आहे. त्यानुसार त्यांनी राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांना आरसी गँगच्या सदस्यांना पोलीस मुख्यालयात घेऊन बोलाविले. देशमुख दहाजणांच्या टोळीला घेऊन मुख्यालयात आले. याठिकाणी डॉ. शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर सर्वजण खाली माना घालून उभे होते. इतर वेळी बाहेर रुबाबात वावरणारे स्वयंघोषित गुंड याठिकाणी म्यॉँव झाले होते. ‘शहरात भाईगिरी चालणार नाही. पुन्हा एखाद्या गुन्ह्यात आढळून आलात तर कायमचे तुरुंगात पाठवीन,’ असा दम देत खाकीचा प्रसाद दिला. यावेळी गुडघ्यावर बसून, दोन्ही हात जोडून ‘आम्ही पुन्हा गुन्हेगारी करणार नाही,’ अशी विनवणी ते करू लागले. ‘ही शेवटची समज असून, सुधारा; अन्यथा गंभीर परिणाम होतील,’ असा इशारा डॉ. शर्मा यांनी या टोळीला दिला.
आर.सी.गँग असा बनला...
जवाहरनगर परिसरात राहुल चव्हाण याने दहशतीच्या जोरावर आपले या भागात वर्चस्व निर्माण केले होते. परिसरात कोणाचे वर्चस्वावरून २००७ ला राहुल चव्हाण याचा एका केश कर्तनालय दुकानामध्ये खून झाला. त्या वेळेपासून राहुल चव्हाण याच्या साथीदारांनी त्याचे नावे शहरात ‘आरसी’ गँगच्या नावाने दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या गँगचा दबदबा वाढत गेला. वेळोवेळी पोलीस प्रशासनाने या गँगच्या मुसक्या आवळल्या. पण, राहुल चव्हाणचा खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी विरोधी गटाच्या प्रमुखावर दसरा चौक परिसरात प्राणघातक शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून केला. त्यानंतर आर.सी.गँंगचा दबदबा वाढला. हळूहळू या गँगमध्ये फूट पडू लागली.
कडक कारवाईची गरज
आर.सी. गँगच्या गुंडांना याअगोदरही खाक्या दाखविला आहे. तरीही या टोळीतील तरुणांची गुन्हेगारी कृत्ये कांही थांबलेली नाहीत. कांहीजणांचा आता व्हॉईट कॉलर गुन्हेगारीकडेही प्रवास सुरू आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे या गुंडांना जरी चपराक बसली असली तरी या टोळीचा बिमोड करण्यासाठी आणखी कठोर कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.