तलवारीने केक कापणाऱ्या आरसी गँगच्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 01:58 PM2019-05-28T13:58:19+5:302019-05-28T14:00:12+5:30
सुभाषनगर हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरसी गँगच्या आणखी दोघांना राजारामपुरी पोलीसांनी मंगळवारी अटक केली.
कोल्हापूर : सुभाषनगर हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरसी गँगच्या आणखी दोघांना राजारामपुरी पोलीसांनी मंगळवारी अटक केली.
संशयित योगेश मानसिंग पाटील (वय २८, रा. पाटील वसाहत, मंगळवार पेठ), जावेद इब्राहीम सय्यद (३०, रा. जवाहरनगर) अशी त्यांची नावे आहेत. या गँगचा म्होरक्या संशयित रवी सुरेश शिंदे, रणजित मारुती कांबळे यांच्यासह साथीदार प्रकाश कांबळे, संदीप गायकवाड, सागर प्रभुदास व्हटकर, सागर सोनवणे (सर्व रा. सुभाषनगर) यांना अद्याप अटक झालेली नाही. ते पसार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
सुभाषनगरमध्ये राहणारा केदार सातपुते याचा ३१ मार्चला वाढदिवस होता. तो आरसी गँगचा कार्यकर्ता असल्याने सुभाषनगर येथील हनुमान मंदिरासमोर रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी संशयितांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता.
यापूर्वी संशयित अमित अंकुश बामणे, गणेश पंडित बामणे, साई संभाजी कांबळे, सनी राम साळे, शुभम दीपक मुळीक, केदार सातपुते (सर्व रा. सुभाषनगर) यांना अटक केली. योगेश पाटील व जावेद सय्यद यांना त्यांच्या घरातुन पोलीसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत.
मोक्का कारवाई अंतिम टप्प्यात
रवी शिंदे, रणजित कांबळे, अमित बामणे, सनी साळे हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, हाणामारी, खंडणीचे ३० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना हद्दपारही केले होते. असे असतानाही त्यांनी शहरात येऊन मित्राचा वाढदिवस साजरा केला होता. आरसी गँगवर संघटित गुन्हेगारीबद्दल मोक्का कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही या गँगच्या विरोधात प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राजारामपुरी पोलिसांनी प्रस्ताव तयार केला आहे. मोक्का कारवाई अंतिम टप्प्यात आहे.