कोल्हापुरातील सर्व मिळकतींचे पुनर्मूल्यांकन करणार : आयुक्त
By admin | Published: April 17, 2015 12:50 AM2015-04-17T00:50:17+5:302015-04-17T00:56:18+5:30
‘त्या’ मिळकतीला परस्पर आठ लाख रुपयांची सूट वसूल न झाल्यास प्रभारी अधीक्षक दीपक टिकेकर व लिपिक अर्जुन बुचडे यांच्या पगारातून पैसे वसूल करून समाधानकारक खुलासा न केल्या वेतनवाढ रोखण्याचा निर्णय
कोल्हापूर : शहरातील अनेक मिळकतींचे मूल्यमापन (असेसमेंट) अपूर्ण, तसेच चुकीचे झाले आहे. त्यामुळे सर्वच मिळकतींचे नव्याने मूल्यमापन करण्याचे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी जारी केले.
तसेच बागल चौकातील ‘त्या’ मिळकतीला परस्पर आठ लाख रुपयांची दिलेली दंडातील सूट वसूल न झाल्यास प्रभारी अधीक्षक दीपक टिकेकर व लिपिक अर्जुन बुचडे यांच्या पगारातून पैसे वसूल करून या प्रकरणी समाधानकारक खुलासा न केल्याने दोघांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. आयुक्तांच्या या दणक्याने घरफाळा विभागातील चुकीच्या मूल्यांकनाआधारे पैसे खाण्यास चटावलेली यंत्रणा हादरून गेली.महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या घरफाळा विभागास तेथील घरभेदींमुळेच घरघर लागली आहे. संपूर्ण विभागच भ्रष्टाचारात कसा बरबटलेला आहे, याचा उदाहरणासह लेखाजोखा ‘लोकमत’ने गेल्या तीन दिवसांत वृत्तमालिकेद्वारे मांडला होता. परिणामी, आयुक्तांनी या विभागातील अनागोंदीकडे जातीनिशी लक्ष देत आता साफसफाईचे संकेत दिले आहेत. बागल चौकातील रि.स.नं. १२२९/२२ या मिळकतीचे मालक दिगंबर यमनजी आंबले (करदाता क्रमांक - ०३०४३०६११) यांना २२ लाख रुपये घरफाळा मिळकतीच्या थकबाकीसाठी परस्पर सूट देत १४ लाख रुपये भरून घेतले व आठ लाख रुपयांची सूट दिली. संबंधित मालकाकडून दंडाची सर्व रक्कम भरून घेणे आवश्यक होते. या प्रकरणाच्या तक्रारीची दखल घेत आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रभारी अधीक्षक दीपक टिकेकर व लिपिक अर्जुन बुचडे यांना तीन दिवसांत खुलासा करण्याची नोटीस बजावली होती. दंडात सूट देण्याचा अधिकार आयुक्तांनाही नाही. मात्र, घरफाळा विभागातील वरिष्ठांच्या संगनमताने अशा अनेक मिळकतींना परस्पर सूट दिल्याचा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. या सर्व प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा निर्धार आयुक्तांनी घेतला आहे. आयुक्तांनी आदेश देऊनही संबंधित टिकेकर व बुचडे यांनी समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे त्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेण्यात आला. मिळकतधारक आंबले यांना दिलेली सूट येत्या १५ दिवसांत वसूल करावी; अन्यथा टिकेकर व बुचडे यांच्या पगारातून हे पैसे कपात करून घ्यावेत, असे आदेशही आयुक्तांनी बजावले. (प्रतिनिधी)
२४ कनिष्ठ लिपिकांची नेमणूक
शहरातील सर्व मिळकतींचे नव्याने असेसमेंट करण्यात येणार आहे. यासाठी घरफाळा विभागातील २४ कनिष्ठ लिपिकांची नेमणूक केली आहे. सर्व लिपिक मिळकतींच्या जागेवर जाऊन पुन्हा तपासणी करून नोंदी घेतील, असे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले.