चाफवडेतील १५० कुटुंबांच्या घरांचे पुनर्मूल्यांकन आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:25 AM2021-05-27T04:25:19+5:302021-05-27T04:25:19+5:30
आजरा : उचंगी प्रकल्पांतर्गत चाफवडे गावातील १५० कुटुंबांच्या घरांचे पुनर्मूल्यांकन करणे व दोन मीटरने उंची वाढविल्यामुळे बुडीत क्षेत्रातील उर्वरित ...
आजरा : उचंगी प्रकल्पांतर्गत चाफवडे गावातील १५० कुटुंबांच्या घरांचे पुनर्मूल्यांकन करणे व दोन मीटरने उंची वाढविल्यामुळे बुडीत क्षेत्रातील उर्वरित भू-संपादन व पाणीपातळी निश्चित करण्याच्या सर्व्हेला आजपासून सुरुवात झाली. पाटबंधारे अधिकारी व कर्मचारी दिवसभर हा सर्व्हे करीत होते. घरांचे पुनर्मूल्यांकन व पाणीपातळीची सीमा निश्चित करण्यास अजून तीन ते चार दिवस लागणार असल्याची माहिती उचंगी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता विजयसिंह राठोड यांनी दिली.
उचंगी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक झाली. बैठकीत चाफवडेच्या १५० कुटुंबांच्या घरांचे पुनर्मूल्यांकन करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने बुधवारी चाफवडे येथील १५० घरांचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले. उचंगी धरणाची उंची २ मीटरने वाढल्यानंतर उर्वरित भूसंपादनासाठी उचंगी, चाफवडे, चितळे, जेऊर गावांतील २७.०१ हेक्टर क्षेत्राची आवश्यकता आहे. संबंधित क्षेत्राची मोजणी करण्यापूर्वी पाणीपातळी ८०१.५० मीटरनुसार सीमा निश्चित करण्याची कार्यवाही बुधवारपासून सुरू झाली आहे.
प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील चाफवडे गावातील ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी डाव्या तीरावर शिल्लक आहेत, अशा १५० प्रकल्पग्रस्तांची घरे खास बाब म्हणून संपादन करून मोबदला रक्कम देण्याबाबतची कार्यवाही यापुढील काळात केली जाणार आहे.
सर्व्हेत उपविभागीय अभियंता विजयसिंह राठोड, कनिष्ठ अभियंता सुशील पाटील, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक स्वरूप खेडकर यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रकल्पग्रस्तांनीही आपल्या घरात संदर्भातील माहिती देऊन आजच्या पुनर्मूल्यांकन सर्व्हेला सहकार्य केले आहे.
-------------------------
फोटो ओळी : उचंगी प्रकल्पांतर्गत चाफवडे गावातील १५० कुटुंबांच्या घरांचे पुनर्मूल्यांकन करताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी.
क्रमांक : २६०५२०२१-गड-०२