ऑनलाइन पर्याय नोंदविलेल्या १६ हजार विद्यार्थ्यांची आजपासून पुनर्परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:41+5:302021-06-30T04:16:41+5:30
कोल्हापूर : ऑनलाइन पर्याय नोंदविलेल्या शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १६ हजार विद्यार्थ्यांची आज, बुधवारपासून ऑनलाइन स्वरूपात परीक्षा होणार आहे. या ...
कोल्हापूर : ऑनलाइन पर्याय नोंदविलेल्या शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १६ हजार विद्यार्थ्यांची आज, बुधवारपासून ऑनलाइन स्वरूपात परीक्षा होणार आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाने या पुनर्परीक्षेचे आयोजन केले आहे. (दि. २०) जुलैपर्यंत परीक्षा होणार आहेत.
ऑफलाइनकडून ऑनलाइन पर्याय नोंदविलेल्या आणि तांत्रिक अडचणीमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती अशा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील १६ हजार विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाने जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतला. त्यानंतर नियोजन करून परीक्षा व मूल्यमापन मंडळाने या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार बुधवारपासून परीक्षा होणार आहेत. या परीक्षेसाठी गेल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट (सराव चाचणी) घेण्यात आली आहे. पुनर्परीक्षेमध्ये बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी, आदी विविध २५ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दि. २० जुलैपर्यंत साधारणत: १०९ परीक्षा होणार आहेत. हिवाळी सत्रात घेण्यात आलेल्या ९९ टक्के परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पुनर्परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. उन्हाळी सत्रामधील परीक्षा घेण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. पुढील आठवड्यात त्याचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असल्याचे परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी मंगळवारी सांगितले.
चौकट
अशी होणार परीक्षा
एक तासाच्या परीक्षेसाठी ५० गुणांचा पेपर असणार आहे. त्यात एमसीक्यू स्वरूपातील २५ प्रश्न असतील. दिवसभरात चार सत्रांमध्ये (सकाळी १०.३० ते ११.३०, दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २.३० ते ३.३० आणि दुपारी ४.३० ते सायंकाळी ५.३०) परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली हेल्पलाइन अद्ययावत केली आहे. हेल्पलाइन सुविधा सकाळी पावणेनऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.