लसीकरणात टंचाईचा पुन्हा व्यत्यय, कोविशिल्ड लस संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:46+5:302021-06-25T04:17:46+5:30
कोल्हापूर : कोविशिल्ड लसीचा पुरवठा खंडित झाल्याने पुन्हा एकदा शहरातील लसीकरणात व्यत्यय आला आहे. त्यामुळे पहिला डोस घेऊन ज्यांचे ...
कोल्हापूर : कोविशिल्ड लसीचा पुरवठा खंडित झाल्याने पुन्हा एकदा शहरातील लसीकरणात व्यत्यय आला आहे. त्यामुळे पहिला डोस घेऊन ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झाले, त्यांना आता लसीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
लसीकरणाच्या सुरुवातीला पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेण्यास सांगण्यात आले. परंतु, लसीचा नियमित पुरवठा होत नसल्याने २८ दिवसांचा कालावधी ८४ दिवसांपर्यंत वाढविण्यात आला. काही दिवस ८४ दिवस पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना सहज, विनागोंधळ लस मिळायला लागली. परंतु, आता पुन्हा एकदा लसीचा तुटवडा जाणवायला लागला आहे.
गुरुवारी लस नसल्यामुळे दोन केंद्रांमधून केवळ १६ नागरिकांचे लसीकरण झाले. यामध्ये महाडीक माळ येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात १० तर फुलेवाडी येथील केंद्रात सहा नागरिकांचे लसीकरण झाले. त्यामुळे ८४ दिवस पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अनेकांना लस मिळाली नाही. त्यांना आता लस मिळण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. शुक्रवारी सुद्धा अनेक नागरिकांना ८४ दिवस पूर्ण झाल्यामुळे शासनाच्या पोर्टलद्वारे कोविशिल्ड लस घेण्याबाबत मेसेज पाठविले आहेत. परंतु, जर लस मिळाली नाही तर त्यांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शहरात आतापर्यंत एक लाख २४ हजार ७७७ नागरिकांना पहिल्या डोसचे तर ४६ हजार ९०१ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी ज्यांचे २८ दिवस पूर्ण झालेले आहेत, अशा नागरिकांनी शुक्रवारी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, फिरंगाई, कसबा बावडा, महाडिक माळ, सिद्धार्थनगर व फुलेवाडी येथील नागरी आरोग्य केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. कोविशिल्ड लस शिल्लक नसल्याने त्याबाबतचे नियोजन करण्यात आलेले नाही.
कोट -
पहिला डोस घेऊन ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना जर लस मिळाली नसेल तर काही काळजी करण्यासारखे कारण नाही. ११२ दिवसांपर्यंत दुसरा डोस घेतला तरी चालतो. जशी लस उपलब्ध होईल, तशी प्राधान्याने ज्यांना आवश्यक आहे अशांना लस घेण्यासाठी फोन केले जात आहेत.
डॉ. अमोलकुमार माने,
प्रभारी आरोग्याधिकारी, महापालिका