अतिक्रमण कारवाईवरून पुन्हा धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 05:51 PM2020-02-29T17:51:59+5:302020-02-29T17:53:52+5:30
कोल्हापूर : अतिक्रमण कारवाईवरून पुन्हा शनिवारी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. बिंदू चौक सबजेल येथील विके्रत्याने साहित्य जप्त करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ...
कोल्हापूर : अतिक्रमण कारवाईवरून पुन्हा शनिवारी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. बिंदू चौक सबजेल येथील विके्रत्याने साहित्य जप्त करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विरोध केल्याने झटापट झाली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही यावेळी घडला. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विक्रेत्यांना बाजूला हटविले. त्यानंतर साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण होते.
कोल्हापूर महापालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने अतिक्रमणांवर संयुक्त मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी बिंदू चौक येथे अतिक्रमण कारवाईवेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना धक्काबुक्कीचा प्रकार झाला. शनिवारीही मोहीम सुरूच ठेवण्यात आली. सकाळी १० वाजता सीपीआर चौक येथून कारवाईला सुरुवात झाली. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले, दुकानदारांचे साहित्य जप्त करण्यात आले.
महापालिका, शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड येथील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आले. फेरीवाले व दुकानदारांनी कारवाईला विरोध केल्याने भवानी मंडप ते बिंदू चौक येथे तणावपूर्ण वातावरण बनले होते. यावेळी अतिक्रमण निर्मुलन पथकाचे राजू माने, रवी कांबळे, शरद कांबळे, माधव निगवेकर, प्रदीप तवंदकर, उदय तावडे, विक्रम कांबळे, लखन कांबळे कारवाईच्या मोहिमेत सहभागी होते.
महापालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
बिंदू चौक सबजेल परिसरात महालक्ष्मी टॉईज या दुकानातील व्यावसायिकाने दारातच खाट टाकून वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. महापालिकेतील कर्मचारी येथील साहित्य जप्त करताना मालकाने विरोध केला. यावेळी कर्मचाºयांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. कर्मचारी आणि मालकांच्यात झटापट झाली. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दुकानदारासा बाजूला केल्यानंतर साहित्य जप्त करण्यात आले.