दाजीपूर-निपाणी रस्त्याची फेरनिविदा काढा - विजय देवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:19 AM2020-07-04T11:19:45+5:302020-07-04T11:20:06+5:30
दाजीपूर व्हाया राधानगरी, मुदाळ तिटा, निढोरीमार्गे निपाणी या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहेच; त्याचबरोबर ते संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे सदर कामाची निविदा रद्द करून फेरनिविदा काढावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.
कोल्हापूर : दाजीपूर व्हाया राधानगरी, मुदाळ तिटा, निढोरीमार्गे निपाणी या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहेच; त्याचबरोबर ते संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे सदर कामाची निविदा रद्द करून फेरनिविदा काढावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.
दाजीपूर ते निपाणी रस्त्याचे काम मार्च २०१८ मध्ये सुरू झाले आहे. निविदेतील मुदतीनुसार हे काम २४ महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र हे काम अतिशय संथगतीने सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे आहे. याबाबत अनेक वेळा लेखी सूचना करूनही कामाची गती वाढत नाही. परिणामी सामान्य माणसाला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
यावर देखरेख करणाऱ्या खासगी कंपनीनेही कामाकडे दुर्लक्ष केले आहे. या कामात ठेकेदार मुदतवाढीची मागणी करण्याची शक्यता आहे. त्याला मुदतवाढ देऊ नये. या कामाची निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढावी, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे विजय देवणे व संजय पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर झालेल्या कामाचा दर्जा आपल्याकडून तपासण्यात येऊन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांना दिले. यावेळी संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, अशोक पाटील, गुंडाप्पा काशीद, अविनाश शिंदे, उत्तम पाटील, लक्ष्मण लाड, आदी उपस्थित होते.