तमदलगे-अंकली ‘बायपास’ पुन्हा वादात
By admin | Published: November 16, 2016 12:01 AM2016-11-16T00:01:17+5:302016-11-16T00:01:17+5:30
शासनाचे धोरण कागदावरच : ‘शासकीय काम सहा महिने थांब’ याचा अनुभव, कोणत्याच उपाययोजना नाहीत
जयसिंगपूर : रस्ते चांगल्या दर्जाचे व खड्डेमुक्त करण्याचे धोरण शासनाकडून राबविले जात असताना सांगली-कोल्हापूर महामार्गावरील तमदलगे बसवान खिंड ते अंकली या बायपास रस्त्यावरील प्रश्न प्रलंबित आहेत. निमशिरगावच्या शाळा स्थलांतराचा प्रश्न, जैनापूर-चिपरी रस्ता, जयसिंगपूर रेल्वेस्थानकाजवळ रस्त्याची झालेली दुरवस्था अशा समस्यांच्या गर्दीत रस्ता सापडला असताना शासनाकडून कोणत्याच उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येते.
चार वर्षांपूर्वी सांगली-कोल्हापूर महामार्गाअंतर्गत तमदलगे बसवान खिंड ते अंकली रस्ता सुप्रीम कंपनीकडे वर्ग झाला होता. सध्या या मार्गावरील काम बंद आहे. जयसिंगपूर येथील रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जैनापूर येथे चौपदरीकरणांतर्गत कामच झालेले नाही. शिवाय निमशिरगावच्या शाळा स्थलांतराचा प्रश्नदेखील जैसे थेच आहे. रस्त्याचे काम सुरू असताना धुळीमुळे रस्त्याकडील शेतीपिकांना फटका बसून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ‘शासकीय काम सहा महिने थांब’ याप्रमाणे गेली चार वर्षे रस्त्याचे काम सुरू होते. अर्धवट रस्त्याचे काम झालेले असतानादेखील सुप्रीम कंपनीकडून टोलनाका सुरू करण्याची घाई झाल्यानंतर सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातून या टोलला मोठा विरोध झाला. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तूर्ततरी टोलनाका व अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम ठप्प आहे.
सुमारे ३४० कोटी रुपये या रस्त्याचे मूल्यांकन करण्यात
आले आहे. ठेकेदार कंपनीकडून तमदलगे बसवान खिंड ते अंकली या मार्गावरील अर्धवट कामे झाली आहेत. अनेक समस्यांना या भागातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, अंकली टोलनाक्यापासून तमदलगेकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर ९०० मीटर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. २९ लाख ५० हजार रुपयांचा निधी रस्ता डांबरीकरणासाठी मंजूर झाला आहे. सोमवारपासून ठेकेदाराने काम सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
टोलनाक्याजवळ रस्त्याचे काम
४सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंकली टोल नाका ते बायपास मार्गावरील ९०० मीटरचा रस्ता केला जात आहे.
४सुप्रीम कंपनीच्या आराखड्यात हा रस्ता नसल्यामुळे शिवाय रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे २९ लाख रुपयांचा निधी या रस्त्यावर खर्च केला जात आहे.
अभियान नावालाच
एकीकडे शासनाकडून राज्यातील रस्ते चांगल्या दर्जाचे व खड्डेमुक्त करण्याचे धोरण राबविले जात आहे, तर दुसरीकडे गेल्या चार वर्षांपासून तमदलगे ते अंकली बायपास रस्त्यावर प्रश्नांची मालिका सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सुप्रीम कंपनीकडे बोट दाखविते. यामुळे शासनाचे खड्डेमुक्त अभियान नावालाच अशी परिस्थिती आहे.
मंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज
जयसिंगपूर रेल्वेस्थानकाजवळील व चिपरी-जैनापूर रस्ता सुप्रीम कंपनी व बांधकाम विभागाच्या वादात अडकला आहे. अंदाजे ८०० मीटरच्या या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दानोळी, कोथळी, कवठेसार, उमळवाड, जैनापूर या गावांतील नागरिकांना सोयीस्कर असणारा हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे वाहतुकीस अडचणीचा ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.