वाचन संस्कृतीपूरक ‘मोबाईल लायब्ररी’

By admin | Published: August 10, 2016 12:43 AM2016-08-10T00:43:10+5:302016-08-10T01:09:16+5:30

सर्वांसाठी खुले वाचनालय : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचा उपक्रम

Reading Library 'Mobile Library' | वाचन संस्कृतीपूरक ‘मोबाईल लायब्ररी’

वाचन संस्कृतीपूरक ‘मोबाईल लायब्ररी’

Next

संतोष तोडकर -- कोल्हापूर --‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने.. शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू.!’ या संत तुकाराम महाराजांच्या ओवीमधून वाचनाचे महत्त्व अधारेखित होते. हेच ओळखून वाचन संस्कृती तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी व रूजावी . ग्रंथालयातील ज्ञान सर्वांना खुले व्हावे यासाठी राजर्षी शाहू छत्रपती कॉलेजने ‘मोबाईल लायब्ररी’ची सुरुवात केली आहे. त्यांच्या या प्रयत्नाला परिसरातील मुलांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.माणसाचे जीवन फुलविण्यात पुस्तकांचा महत्त्वाचा वाटा असतो; परंतु आर्थिक कारणास्तव वा अन्य बाबींमुळे पुस्तके विकत घेऊन वाचणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यातून या उपक्रमाची संकल्पना उदयास आली. शाहू कॉलेजच्या आसपास सदर बझार, विचारेमाळ या भागात गरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. इथे वाचनालयाची सोय नव्हती की लोकांना त्याचे महत्त्व नव्हते म्हणून मग प्राचार्य डॉ. राजेंद्र
कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल प्रा. एस. बी. कोरडे यांनी २०१२ पासून या भागात ‘मोबाईल लायब्ररी’ हा उपक्रम सुरू केला.
झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना अवांतर वाचनासाठी पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसते शाळेतील ग्रंथालयेही समृद्ध नसतात म्हणून महाविद्यालयातर्फे सुरुवातीला ९ ते १६ या वयोगटांतील मुलांसाठी बालसाहित्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यासाठी वीस हजार रुपयांची नवी पुस्तके खरेदी करण्यात आली. आधी दबकत, बिचकत येणारी मुले ग्रंथालयातील मोकळ्या वातावरणाने लवकरच या उपक्रमात रमली व गोष्टींच्या पुस्तकांतून हरवून गेली.
दर शनिवारी दुपारी चार वाचता नवी पुस्तके घेण्यासाठी मुलांची गर्दी होते. सध्या या उपक्रमाचा परिसरातील १०२ मुले लाभ घेत आहेत. तसेच यामध्ये येत्या काळात आणखी वाढ होण्याची आशा प्राचार्य कुंभार यांना आहे.
‘एक स्त्री शिकते तेव्हा संपूर्ण घर शिकते;’ असे म्हणतात. त्याच उद्देशाने दुसऱ्या टप्प्यात परिसरात राहणाऱ्या महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यायचे ठरविले. त्यानुसार कॉलेजतर्फे घरोघरी जाऊन प्रबोधन करण्यात आले. सहभागी करून घेताना त्यांच्या आवडी-निवडी,आरोग्य, घरकाम, चरित्र, व्यवसाय, आदी माहिती भरून घेण्यात आली व ज्या विषयात रस असेल ती पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. दर शुक्रवारी जुनी पुस्तके जमा करून नवे पुस्तक दिले जाते. सध्या या उपक्रमात २०० महिला सहभागी झाल्या आहेत. यासह या ग्रंथालयातील पुस्तके कदमवाडी येथील मनोयुवा ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्यांसाठीही खुली करण्यात आली आहेत.


पुढाकार : नव्या पुस्तकांसाठी
परिसरातील गरीब, होतकरू मुले या उपक्रमात उत्साहाने सहभागी होतात. एखाद्या नव्या पुस्तकाची मुलांनी मागणी केली आणि ते जर ग्रंथालयात उपलब्ध नसल्यास नवे विकत घेऊन ते उपलब्ध करून देण्यास महाविद्यालयातर्फे पुढाकार घेतला जातो. गप्पा, गोष्टी, बोधकथा यांसह महान व्यक्तींच्या चरित्रग्रंथांचे, ऐतिहासिक कादंबरींची मागणीही केली जाते.


कॉलेजच्या ग्रंथालयातील सत्तर हजार पुस्तके आहेत. ते ज्ञान समाजातील सर्व स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
- प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार, प्राचार्य, शाहू कॉलेज

समाजात वाचन संस्कृती रूजावी. ग्रंथालये फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित न राहता जे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर आहेत. त्यांना वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.
- प्रा. ए. बी. कोरडे, ग्रंथपाल, शाहू कॉलेज

Web Title: Reading Library 'Mobile Library'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.