वाचिक दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:57 PM2019-06-02T23:57:17+5:302019-06-02T23:57:22+5:30

इंद्रजित देशमुख कायिक दानाबरोबर आम्हाला देता येण्यासारखं त्याहून सोपं पण अधिक प्रभावी दान म्हणजे वाचिक दान होय. वाणी हा ...

Readings donated | वाचिक दान

वाचिक दान

Next

इंद्रजित देशमुख
कायिक दानाबरोबर आम्हाला देता येण्यासारखं त्याहून सोपं पण अधिक प्रभावी दान म्हणजे वाचिक दान होय. वाणी हा खूप प्रभावीपणे दान देता येण्यासारखा विषय आहे. चार सामर्थ्यभरीत शब्द केव्हाही कोट्यवधी रुपये खर्चून जे काम होणार नाही ते काम करू शकतात, याचसाठी आमचे तुकोबाराय म्हणतात की,
शब्दचि आमुच्या जिवीचे जीवन।
शब्द वाटू धन जनलोका।।
या वचनाचा विचार केला तर जगातील सगळ्यात प्रभावी दान म्हणजे शब्ददान होय. या शब्दांच्या जोरावरच कुणी एखाद्या निष्प्रभ असलेल्या चेतनेला चैतन्याची चेतना देऊ शकतो. आमच्या स्वातंत्र्यलढ्यावेळी जिवंत असून, मृतकर्तव्य करीत असलेल्या जनतेला पेटून उठायला लावलं ते निव्वळ आणि निव्वळ शब्दांनीच. राष्ट्रवीरांनी केलेली भाषणं किंवा लिहिलेले विचार यांनी त्या काळातील जनतेने स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिले आणि ती सगळी माणसं देशासाठी जीवही द्यायला तयार झाली. हा सगळा शब्दांचाच प्रभाव होता. तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर
तीक्ष्ण उत्तरे।
हाती घेऊनी बाण फिरे।। किंवा
शब्दांचीच शस्रे यत्ने करू ।।
असा प्रभाव त्या समाजात या शब्दसामर्थ्याने तयार झाला होता.
आमच्या भूमीत झालेले संत अगदी आजतागायत आमच्या मनात चांगुलपणाची ज्योत तेवत ठेवत आहेत ते फक्त या शब्दांच्या रूपातच. संतांनी तुमचं माझं जगणं अतिसमृद्धपणाने संपन्न व्हावं याचसाठी जो मार्ग अवलंबला होता तो म्हणजे शब्दसाहित्यच आहे. म्हणूनच ते कधी आम्हाला प्रयत्नवादी बनण्यासाठी सांगतात की,
असाध्य ते साध्य करिता सायास।
कारण अभ्यास तुका म्हणे।। अभ्यासाच्या बळावर कितीतरी समजायला आणि सत्यात उतरवायला कठोर वाटणाऱ्या गोष्टी आपण सहज करू शकतो, असं सांगतात.
कधी आमच्या गर्भगळीत वृत्तीने हताश होणाºया वृत्तीला आळा घालण्यासाठी आम्हाला सांगतात की,
मन करा रे प्रसन्न।
सर्व सिद्धीचे कारण।। यातून आम्हाला जी काही कामे करावयाची आहेत ती सगळी मनापासून आणि मन प्रसन्न ठेऊन करावीत, असे सांगतात. कोणतेही काम मनापासून आणि प्रसन्न मनोधारनेने करावे. तसे केले तर कितीतरी कठीण आणि अवघड गोष्टी आम्ही सहजगत्या पूर्ण करू शकू.
कधी आमच्या लाचार आणि आयदी वृत्तीला सखोल समज देताना सांगतात की,
भिक्षापात्र अवलंबणे।
जळो जिणे लाजिरवाणे।।
या सांगण्यातून आम्ही कधीच ऐतखाऊ बनू नये, असा परखड आग्रह आमच्या समोर व्यक्त करतात.
सैरभैर दौडणार आमचं विक्षिप्त मन आणि त्यातून निर्माण होणारे कितीतरी अपाय कमी होऊन आमचे वैयक्तिक आणि सामाजिक जगणे अति समृद्ध होण्यासाठी महाराज आम्हाला सांगतात की,
युक्त आहार विहार।
नियम इंद्रियांसी सार।। कायिक, वाचिक आणि मानसिक अशा सर्व तºहेचे सेवनयुक्त म्हणजे योग्यच असावे त्याखेरीज आम्हाला साध्य प्राप्तीची साधना करता येणार नाही. आमच्या आजच्या दैनंदिन जीवनातील कितीतरी समस्या दूर करणाºया कितीतरी उत्तरांचे दान आमच्या संतांनी आम्हाला शेकडो वर्षांपूर्वी दिले आहे. मुळात संतांनी आम्हाला शब्दांचं जे दान दिले आहे, महाराज म्हणतात की,
घातला दुकान।
देती अलियासी दान।
संत उदार उदार।
भरले अनंत भांडार।। किंवा संतसज्जनी मांडले दुकान,
जे जया पाहिजे ते आहे रे।
भुक्तीमुक्ती फुकाचसाठी,
कोणी तयाकडे न पाहे रे।।
उद्वेगाने खजील झालेलं मन, पराभवाच्या किंवा अपयशाच्या शल्याने खचलेले आत्मभान अगदीच व्यवस्थितपणे सरळ करायचे असेल तर शब्दच किंवा शब्दाद्वारे झालेलं समुपदेशनचं अतिउपयोगी ठरत असतं. म्हणूनच आपल्याला बाकी काही द्यायला जमत असेल किंवा नसेल, पण निदान आपल्या वाणीतून बाहेर पडणारे शब्द तरी एखाद्याला जीवनाधार ठरणारे असावेत. हे सहजगत्या केलेलं शब्ददान एखाद्याचं जीवन बदलवू शकतं. आम्ही मोकळ्या मनाने केलेल्या या दानातून एखादा नापास झालेला विद्यार्थी तणावाने आयुष्य संपवायचा घेतलेला निर्णय बदलू शकतो. एखादा रोगी परत आपल्या जीवनात सकारत्मकता उपस्थित करू शकतो. रानातील पीक, बाजारातील ईक आणि पोटातील भूक यांचा मेळ न लागल्यामुळे जीवन संपवू पाहणारा एखादा शेतकरी परत आपल्या हातात कुदळ, फावडे घेऊ शकतो आणि समारोपातही सृजनता धारण करू शकतो.
साच आणि मवाळ।
मितले आणि रसाळ।
शब्द जैसे कल्लोळ।
अमृताचे।। असं शब्दसंयोजन करून ते जगाला बहाल करूया. सहजीवी व सहवेदी सकारात्मक शब्ददाते बनूया.
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)

Web Title: Readings donated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.