नवरात्रौत्सवासाठी फळ मार्केट सज्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 07:29 PM2017-09-17T19:29:55+5:302017-09-17T19:37:16+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिक्कू, सफरचंद, सीताफळासह उपवासाच्या खजुराला कोल्हापुरातील रविवारी आठवडी बाजारात मागणी वाढली आहे. खजुराचा किलोचा दर ९० ते शंभर रुपयांच्या जवळपास झाला आहे.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिक्कू, सफरचंद, सीताफळासह उपवासाच्या खजुराला कोल्हापुरातील रविवारी आठवडी बाजारात मागणी वाढली आहे. खजुराचा किलोचा दर ९० ते शंभर रुपयांच्या जवळपास झाला आहे.
यंदा जीएसटीचा फटका खजुराला बसला आहे. त्याचा गतवर्षीचा दर हा ६० रुपयांपासून ते ६४ रुपयांपर्यंत असा होता. दुसरीकडे, भाजीपाल्यांची आवक वाढल्याने दर किचिंत कमी झाले आहेत. मात्र, कोथिंबीर पेंढीचा दर हा २५ ते ३० रुपये असा होता. अन्नधान्याची निर्यात सुरू झाल्याने विविध प्रकारच्या डाळीचे भावसुद्धा वधारले आहेत.
नवरात्रौत्सव गुरुवार(दि. २१)पासून सुरू होत आहे. त्यामुळे आठवडी बाजारात विशेषत: फळ मार्केटला ग्राहकांची मागणी जास्त होती. गेल्या आठवड्यात असणारा चिक्कूचा प्रतिकिलो दर ३० ते ४० रुपयांचा दर या आठवड्यात ६० रुपयांच्या घरात गेला आहे. सफरचंद (इंडियन)चा बॉक्स १८०० रुपये तसेच एक किलो सीताफळ १२५ रुपये, मोसंबीचे चुमडे ६०० रुपये, संत्र्यांचा बॉक्स १७५० रुपये, डाळींब ४० रुपयाला किलो, अननस २५० रुपयाला डझन तर पपईचा ढीग १०० रुपयांना होता.
त्याचबरोबर सन २०१५ ला खजूर प्रतिकिलो दर हा ५० ते ६० रुपये, त्यानंतर गतवर्षी तो ६० ते ६४ रुपये असा होता पण, यंदा तो नवरात्रौत्सव सणावेळी ९० ते शंभर रुपयांपर्यंत गेला आहे तसेच डाळीची निर्यात सुरू झाल्याने दर वधारले आहे. तूरडाळ ही ७० रुपयांवरून ती ७५ रुपये, हरभरा ८० वरून ८८ रुपये झाली आहे. मात्र, तांदळाचे दर ‘जैसे थे’ आहेत. एक नंबर शेंगदाणा हा साधारणत : ९० ते १०० रुपये आहे.
कांदा, बटाटा आवक घटली...
या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कांदा, बटाटा आवके व दरावर झाला आहे. कांद्याचा दहा किलोचा दर १४० रुपये होता; परंतु बटाटा दर स्थिर होता. तो ८० रुपये होता.
कोथिंबीरची पेंढी २५-३० रुपयांच्या घरात
दोन आठवड्यांपूर्वी कोथिंबीरची पेंढी ही १० ते १५ रुपयांवर होती. ती आज २५ ते ३० रुपयांवर गेली आहे. वास्तविक आवक वाढल्याने दर कमी होणे आवश्यक होते; पण, कोथिंबीरच्या आवकेबरोबर दर ही वाढला आहे. शेकड्याचा दर १४०० रुपये गेला होता.
सध्या चिक्कूचा दर हा नवरात्र सणामुळे ६० रुपये झाला आहे. हा दर पुढील दोन-तीन दिवसांत आणखी वाढेल. तो ७५ ते ८० रुपयांच्या जवळपास जाईल.
- समीर सातारकर,
फळ विक्रेते,लक्ष्मीपुरी.