‘गडहिंग्लज’च्या कामगारांसाठी प्रसंगी मुश्रीफांशीही बोलायला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:27+5:302021-02-06T04:43:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नासाठी मी मध्यस्थी करायला तयार आहे. त्यासाठी कारखान्याचा संचालक, ...

Ready to talk to Mushrifs on occasion for Gadhinglaj workers | ‘गडहिंग्लज’च्या कामगारांसाठी प्रसंगी मुश्रीफांशीही बोलायला तयार

‘गडहिंग्लज’च्या कामगारांसाठी प्रसंगी मुश्रीफांशीही बोलायला तयार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नासाठी मी मध्यस्थी करायला तयार आहे. त्यासाठी कारखान्याचा संचालक, ब्रिक्स कंपनी व प्रतिनिधी या नात्याने प्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संयुक्तपणे बोलण्यास आपण तयार आहोत. परंतु, कोणत्याही परिस्थितीत कामगारांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.

गेल्या २२ दिवसांपासून येथील प्रांत कचेरीसमोर थकीत फायनल पेमेंट, ग्रॅच्युईटी व वेतन फरकाच्या मागणीसाठी गडहिंग्लज कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचे धरणे आंदोलन सुरू आहे. आज (गुरूवारी) घाटगे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी घाटगे म्हणाले, कारखान्याच्या वाटचालीमध्ये या कामगारांचे योगदान आहे. करारामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, परंतु त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. राजकारण बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्यासोबत ठाम राहणार आहे.

यावेळी भाजप शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, रवींद्र घोरपडे, युवराज बरगे, सुनील गुरव, बेनिता डायस, विठ्ठल भमानगोळ, अनिल खोत, शैलेंद्र कावणेकर, प्रीतम कापसे, कुमार पाटील, तुषार मुरगुडे, अजित जामदार आदींसह कामगार उपस्थित होते.

-------------------------------------

* केवळ पाठिंबा नाही..!

‘तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है’ असे बोलून केवळ तेल लावायला मी आलेलो नाही. कामगारांच्या प्रश्नांची मला जाण आहे. पाठिंबा हा परक्या व्यक्तीला दिला जातो. मी तुमच्यातीलच एक आहे. त्यामुळे केवळ पाठिंबा नाही, तर आंदोलनात मीही सामील आहे, असेही घाटगे म्हणाले.

-------------------------------------

* हवेत बार नकोत, डेडलाईन द्या

कामगारांच्या देण्यांसंदर्भात कारखाना आणि कंपनीकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. आश्वासनांचे केवळ हवेत बार नकोत, त्यांनी पैसे देण्याची डेडलाईन द्यावी, अशी टिप्पणी घाटगेंनी यावेळी केली.

-------------------------------------

* फोटो ओळी : भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी गडहिंग्लज प्रांत कचेरीसमोर आंदोलनाला बसलेल्या गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांना मार्गदर्शन केले.

क्रमांक : ०४०२२०२१-गड-०२

Web Title: Ready to talk to Mushrifs on occasion for Gadhinglaj workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.