मद्यसाठा रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज लोकसभा निवडणूक पार्श्वभूमी : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:55 AM2019-02-21T00:55:57+5:302019-02-21T00:56:27+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच आतापासूनच जिल्ह्यात गोव्याहून विदेशी मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिन्याभरात डझनभर
एकनाथ पाटील ।
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच आतापासूनच जिल्ह्यात गोव्याहून विदेशी मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिन्याभरात डझनभर कारवाया करून लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या चारी सीमांवर (बॉर्डर) करडी नजर ठेवत विशेष भरारी पथकांची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. विभागीय उपायुक्त यशवंत पवार आणि अधीक्षक गणेश पाटील यांनी यासंदर्भात नुकतीच अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कठोर कारवाईच्या सूचना केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे; त्यासाठी उमेदवारांच्या पंटरांनी गल्ली-बोळांत, गावा-गावांत दारूचे बॉक्स पोहोच करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने वातावरण तापू लागले आहे. गतवर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त केला होता. लोकसभा निवडणूक चुरशीची होत असल्याने दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने ती रोखण्याचे मोठे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे.
विभागीय उपायुक्तयशवंत पवार आणि अधीक्षक गणेश पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून येणाºया चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरून विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. गोव्यामध्ये दारूचे दर कमी असल्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील पंटरांचा या ठिकाणाहून ट्रक भरून मद्यसाठा आणण्याची तयारी असते; त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून वाहनांची, विशेषत: प्रवासी एस. टी. बस, ट्रॅव्हल्स गाड्या व खासगी वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले.
हातभट्टीची धग कायम
शहरालगतच्या उपनगरांसह ग्रामीण भागात गावठी हातभट्ट्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग वारंवार कारवाई करूनही या हातभट्ट्यांची धग कायम सुरूआहे. गावागावांत बेकायदेशीर देशी-विदेशी दारूंचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. या सर्व बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर छापे टाकण्याची तयारी पथकांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दारूची तस्करी रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. छुप्या मार्गाने दारूची वाहतूक करणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल.
- गणेश पाटील, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर