साक्षात देवच रुग्णालयात वावरत असल्याचा अनुभव आडसूळ कुटुंबीयांच्या भावना : डी. वाय. पाटील रुग्णालयाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:51+5:302021-07-16T04:17:51+5:30
कोल्हापूर : ज्यावेळी मंदिरांना कुलुपे लावली व स्वतः देवही मंदिर सोडून गेले पण मला वाटतं देव मंदिर सोडून दवाखाना, ...
कोल्हापूर : ज्यावेळी मंदिरांना कुलुपे लावली व स्वतः देवही मंदिर सोडून गेले पण मला वाटतं देव मंदिर सोडून दवाखाना, डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कामगार, आरोग्य कर्मचारी, पोलीस, समाजसेवक यांच्या रूपाने ठिकठिकाणी वावरत होता, याची प्रचिती आम्हाला कोरोना पॉझिटिव्ह काळात आल्याच्या भावना डॉ. आर. एस. आडसूळ व त्यांच्या पत्नी विद्या आडसूळ यांनी व्यक्त केल्या आहेत. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले, या रुग्णालयात मिळालेल्या उत्तम सेवेबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
त्या म्हणतात, मला १७ मे २०२१ ही तारीख कधीही विसरता येणार नाही. यादिवशी माझे पती कोरोना पॉझिटिव्ह आले. गेले वर्ष, दीड वर्ष याविषयी वेगवेगळी खरी, खोटी माहिती ऐकत होतो. परंतु, स्वतःवर हा प्रसंग आल्यावर काय होते, ते अनुभवले. मनाची काय घालमेल होते, हे सांगता येत नाही. पती डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल झाले व मी घरी अलगीकरणात राहिले. पण २२ मे रोजी माझाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच रुग्णालयात दाखल झाले. आम्ही दोघेही १७ मे ते २ जूनपर्यंत या रुग्णालयात होतो. त्यावेळचा तिथला अनुभव खूपच छान होता. डॉ. वैशाली गायकवाड व इतर डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी व इतर सर्व स्टाफ यांच्या कामाला सलाम. प्रमुख डॉक्टर्स, अजित पाटील, सर्व विभागांचे प्रमुख यांचे खूपच सहकार्य लाभले. रुग्णालयातील स्वच्छ्ता, चहा, नाष्टा, जेवण, रुग्णांची वेळोवेळी तपासणी या गोष्टी चांगल्या होत्या. या रुग्णालयाच्या माध्यमातून डॉ. डी. वाय. पाटील यांचा समाजसेवेचा वारसा डॉ. संजय पाटील, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांनी पुढे चालवला आहे, याचा आनंद वाटला. कृषी, शिक्षण व आरोग्य या तिन्ही गोष्टी समाजासाठी पुरवणे म्हणजे खरा उन्नत समाज उभा करणे होय. त्यात डी. वाय. ग्रुपने देशाने दखल घ्यावी इतके चांगले काम उभे केले आहे, ही कोल्हापूरसाठीही अभिमानाची गोष्ट आहे.