निवडणूक ‘अर्थ’कारणाने गाजण्याचे संकेत
By Admin | Published: April 13, 2016 12:45 AM2016-04-13T00:45:45+5:302016-04-13T00:54:28+5:30
इचलकरंजी नगरपालिका : राजकीय पक्षात उदासीनता; श्रेष्ठींमध्ये अस्वस्थता
इचलकरंजी : नगरपालिकेची निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर आली असली तरी सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमालीची शांतता आहे. आगामी निवडणूक राजकारण किंवा समाजकारणाऐवजी ‘अर्थ’कारणानेच गाजणार, असे संकेत मिळत असल्याने सध्याची उदासीनता भासत असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या श्रेष्ठींमध्ये काहीशी अस्वस्थताही आहे.
शहरामध्ये कॉँग्रेसचे वर्चस्व असले तरी पूर्वीपासूनच स्थानिक पातळीवर गटबाजीचे राजकारण आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उदयापासून तोही पक्ष येथे चांगला प्रभावी आहे. याशिवाय भाजप, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आदी पक्षसुद्धा त्यांची ताकद आणि दबदबा राखून आहेत. मात्र प्रकाश आवाडे (कॉँग्रेस) विरोधकांची एक आघाडी असून, तिला शहर विकास आघाडी असे नाव आहे. तीमध्ये भाजप, शिवसेना, दोन्ही कॉँग्रेसमधील बंडखोरांची मोट असून, ती आमदार सुरेश हाळवणकर यांनी बांधली आहे.
इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुका होताना कॉँग्रेस आणि कॉँग्रेस विरोधक एकत्रितपणे असे येथील राजकारणातील नित्याचेच स्वरूप आहे. त्याला अपवाद गतवेळची सन २०११ मधील निवडणूक ठरली. या निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी व ‘शविआ’ असा तिरंगी सामना रंगला. तेव्हा तत्कालीन कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अनेक मंत्र्यांनी त्यांच्या-त्यांच्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. तशा ‘शविआ’साठी काही भाजपच्या नेत्यांनीही प्रचार सभा घेतल्या होत्या.
अशा पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत नगरपालिकेतील एकूण ५७ नगरसेवकांपैकी ३० नगरसेवक कॉँग्रेसचे, १० नगरसेवक राष्ट्रवादीचे व १७ नगरसेवक ‘शविआ’चे निवडून आले होते. निवडणुकीनंतर कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांनी आघाडी करीत पालिकेत सत्ता स्थापन केली. मात्र, जानेवारी २०१५ मध्ये कॉँग्रेसच्या नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांनी पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला नाही. बंड केले आणि नगराध्यक्षांच्या बंडाला पालिकेतील विरोधी ‘शविआ’ने पाठिंबा दिला. त्याचा परिणाम म्हणून गेले वर्ष पालिकेतील राजकारणाचे संदर्भ बदलले आहेत. त्याचप्रमाणे
आता आगामी निवडणूक ही ‘अर्थ’कारणावर अवलंबून असेल, असे अनेक राजकीय क्षेत्रांतील अनेकांचे मत आहे. (प्रतिनिधी)
नगराध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग
आगामी नगराध्यक्षपद मागासवर्गीय जातीसाठी आरक्षित आहे. त्याचीही तयारी काहींनी आतापासूनच सुरू केली असून, ‘माझ्याशिवाय हाय कोण’ अशी त्यांची भूमिका आहे. तसे उपक्रमसुद्धा राबविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे, तर एका माजी लोकप्रतिनिधीने शेजारच्या विधानसभा मतदारसंघातून इचलकरंजी शहरात नावनोंदणी करण्याचा खटाटोप सुरू केला आहे.
इच्छुकांची भाऊगर्दी
निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या पातळीवर उदासीनता असली तरी शहरातील काही प्रभागांतील इच्छुकांनी विविध नागरी सेवा-सुविधांच्या मागणीच्या नावाखाली आंदोलने सुरू केली आहेत. अशा आंदोलनातून आपण ‘भावी नगरसेवक’ असल्याच्या अविर्भावात नेतृत्व करीत भाषणबाजीसुद्धा चालू केली आहे. अशा आंदोलनांमध्ये पिण्याच्या पाण्यापासून गटार बांधणीपर्यंत समस्या मांडल्या जात आहेत.