'हाता'कडून 'वेळ' न आल्याचे कारण पुढे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:45+5:302021-07-21T04:17:45+5:30
निंगाप्पा बोकडे चंदगड : कोल्हापूर जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत चंदगड तालुक्याच्या पदरी पुन्हा निराशा पडल्याने 'हाता'ने 'वेळ' न आल्याचे ...
निंगाप्पा बोकडे
चंदगड
: कोल्हापूर जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत चंदगड तालुक्याच्या पदरी पुन्हा निराशा पडल्याने 'हाता'ने 'वेळ' न आल्याचे सांगून तालुक्याला ठेंगा दाखविला आहे.
जिल्हा परिषदेची पदाधिकारी निवड नुकताच झाली. सुरुवातीला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक युवराज पाटील, जयवंतराव शिंपी यांची नावे आघाडीवर होती. त्यापैकी अपेक्षेप्रमाणे आमदार राजेश पाटील यांनी जयवंतराव शिंपी यांना उपाध्यक्ष म्हणून संधी देण्यात यश मिळवले आहे; पण दिल्ली आणि मुंबईवरून झालेल्या हालचालीत युवराज पाटील यांचे नाव मागे पडून अनपेक्षितपणे आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील जिल्हा परिषद अध्यक्षपदी बिनविरोध विराजमान झाले.
त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवडीत मात्र 'सतेज' टीममधून माणगाव जिल्हा परिषदेच्या कल्लाप्पा भोगण यांच्या नावाची चर्चा होती; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्वच सभापतीपदी महिलांना संधी देण्यात आली. त्यामध्ये चंदगड तालुक्याच्या पदरी निराशा आली आहे.
'सतेज' टीमवर कुरघोडी
राष्ट्रीय काँग्रेसच्या धोरणानुसार येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत, यासाठी जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात सतेज टीम कार्यरत आहे. हीच टीम आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात कार्यरत होती, अशी कुजबुज होती. याचा बदला म्हणून आमदार राजेश पाटील यांनी आजऱ्याचे जयवंतराव शिंपीसाठी प्रयत्न चालविले. 'गोकुळ'मध्ये पराभवामुळे नाराज झालेल्या आमदार पाटील यांना नाराज यावेळी डावलणे शक्य झाले नाही. त्यामुळे आमदार पाटील यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्यात यश मिळविल्याची चर्चा सध्या ऐकावयास मिळत आहे.
पदाधिकारी निवडीत विधान परिषदेची पेरणी
पुढीलवर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा विचार करून पदाधिकारी निवडीत जिल्ह्यात समतोल साधण्याचा प्रयत्न नेतेमंडळींनी केला आहे. यामध्ये सध्यातरी नेते मंडळींना यश आले असे दिसत असले तरी ते कितपत यशस्वी झालेत, हे येणार काळ ठरविणार आहे.
प्रतिक्रिया :
सुरुवातीला जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती पदासाठी माझे नाव आघाडीवर होते; पण नेतेमंडळींनी केडीसी बँक व विधान परिषदेचा विचार करून पहिल्या निर्णयात बदल केला; पण आपण नाराज नाही. पुढील काळातही वरिष्ठांच्या सूचनेनुसार जोमाने काम करणार आहे.
कल्लाप्पा भोगण, माणगाव, जि. प. सदस्य.