बंडखोर गटाला अल्टिमेटम
By admin | Published: November 15, 2016 12:13 AM2016-11-15T00:13:19+5:302016-11-15T00:22:07+5:30
विधानपरिषद निवडणूक : आदेशाबाबत विशाल पाटील गटाचे मौन
सांगली : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीतील बंडखोर विशाल पाटील गटास अल्टिमेटम दिला आहे. मंगळवारपर्यंत त्यांनी आदेशाचे पालन केले नाही, तर शहर जिल्हाध्यक्षांकडून अहवाल मागवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत विशाल पाटील गटाने कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहनराव कदम यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी शिष्टाई करूनही या गटाने कोणाचेही ऐकले नाही. रविवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना बंडखोरी थांबवून कदम यांना पाठिंबा जाहीर करण्याचे आदेश पाटील यांना दिले होते. आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही चव्हाण यांनी दिला होता. त्यामुळे विशाल पाटील गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले शेखर माने कोणती भूमिका जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोमवारपर्यंत पक्षांतर्गत संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, मात्र चव्हाण यांच्या आदेशाचा कोणताही परिणाम झाला नाही.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सोमवारी विशाल पाटील गटाच्या हालचालींची माहिती घेतली. मंगळवारी सकाळपर्यंत त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला नाही, तर त्यासंदर्भातील स्थानिक कॉँग्रेस कमिटीचा अहवाल घेऊन कारवाई करण्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला आहे. सोमवारी दिवसभर या गटाने बंडखोरी थांबविण्याबाबत कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. बंडखोरी कायम ठेवण्याच्या ते तयारीत असल्याने पक्षाकडून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीकडून खेळ्या
कॉँग्रेसमधील बंडखोरीला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीने सांगलीतील एका पदाधिकाऱ्यावर जबाबदारी सोपविली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीनंतर रविवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या या स्थानिक नेत्याने बंडखोर गटाशी संपर्क साधल्याचे समजते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीवेळीही राष्ट्रवादीच्या याच नेत्याने शेखर माने यांच्याशी सातत्याने संपर्कठेवला होता.