बंडखोर हे खरे शिवसैनिक नव्हेत
By admin | Published: October 5, 2015 12:53 AM2015-10-05T00:53:56+5:302015-10-05T00:55:24+5:30
शिवाजी जाधव : त्यांची शिवसेनेतून लवकरच हकालपट्टी करणार
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सक्षम उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे मुलाखतीला न येता किंवा साधी उमेदवारी मागणी अर्ज न करणाऱ्यांची व नाहक आरोप करणाऱ्यांची लवकरच वरिष्ठांशी चर्चा करून पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे. त्यामुळे बंडखोरीचे आव्हान देणारे ‘खरे शिवसैनिक’ नाहीतच, असा आरोप शिवसेना शहरप्रमुख शिवाजी जाधव यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
तटाकडील तालीम प्रभाग आणि दुधाळी पॅव्हेलियन या प्रभागांतून उमेदवारी डावलल्यामुळे अनुक्रमे रिक्षाचालक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, तसेच सतीश ढवळे आणि नितीन पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून शिवसेनेत बंडखोरी करणार असल्याचे शनिवारी जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख शिवाजी जाधव यांनी हे पत्रक प्रसिद्धीस देत हकालपट्टी करणार असल्याचे जाहीर केले.
शहरप्रमुख शिवाजी जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापालिकेवर शिवसेना एकहाती सत्ता आणणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या याद्या या सर्वसमावेशक आहेत; पण काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून हे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बंडखोरीची भाषा करून पत्रकबाजी करणाऱ्यांनी, तसेच शिवसेनेविरोधात जनतेमध्ये गैरसमज पसरविणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असाही सल्ला देण्यात आला आहे.
प्रभाग क्र. ५३ या दुधाळी पॅव्हेलियन या विभागातून बंडखोरीची भाषा करणाऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत पक्षहिताचे कोणते काम केले, याचा विचार करावा. नितीन पाटील, सतीश ढवळे यांनी उमेदवारी मिळण्याकरिता रितसर अर्ज केला नव्हता. त्यांनी मुलाखतीवेळीही उपस्थिती दाखविली नव्हती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
बंडखोर आणि गद्दारांना शिवसेनेत काडीमात्र किंमत नसून आगामी निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यास त्यांच्याविरोधात लवकरच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून काही दिवसांत त्यांची पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचाही इशारा शिवाजी जाधव यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
साळोखे दांपत्य शिवसेनेचे नगरसेवक होते
प्रभाग क्र. ४८ या तटाकडील तालीम प्रभागातून माजी महापौर उदय साळोखे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. ते शिवसेनेसाठी उपरा उमेदवार नसून ते आणि त्यांची पत्नी शिवसेनेचे नगरसेवक होते, याची माहिती बंडखोरीची भाषा करणारे रिक्षा सेना जिल्हाप्रमुख राजू जाधव यांना नसावी.
सर्व्हेअंती व चर्चेअंती निवडून येणाऱ्या सक्षम उमेदवारांची निवड केल्याची माहिती राजू जाधव यांना माहीत आहे. त्यामुळे अपक्ष निवडणुकीची भाषा करणाऱ्या राजू जाधव यांनी विचार करावा.