सभापती पदावरून काँग्रेसमध्ये बंडखोरी
By admin | Published: January 25, 2017 12:44 AM2017-01-25T00:44:59+5:302017-01-25T00:44:59+5:30
महिला व बालकल्याण समिती : ‘स्थायी’च्या पॅटर्नची पुनरावृत्ती
सांगली : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी सत्ताधारी काँग्रेसमधून दोन अर्ज दाखल झाले आहेत. उपमहापौर गटाने स्वतंत्र अर्ज भरल्याने बंडखोरीची शक्यता अधिक आहे. महिन्याभरापूर्वी झालेल्या स्थायी समिती सभापती निवडीच्या पॅटर्नचीच यावेळीही पुनरावृत्ती होणार, की काँग्रेसमधील वाद मिटणार, याचा फैसला बुधवारी होणार आहे.
महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. या कालावधित काँग्रेसमधील मदनभाऊ गटाकडून विद्यमान सभापती गुलजार पेंढारी, उपमहापौर गटाकडून सुनीता खोत, तर विरोधी राष्ट्रवादीकडून प्रियंका बंडगर, असे तीन अर्ज दाखल झाले. सकाळपासूनच महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार यांनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली होती. दुपारी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोघांचे अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी महापौरांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या गटातून सुनीता खोत यांचा अर्ज भरण्यात आला. या अर्जावर स्वाभिमानी आघाडीच्या संगीता खोत यांना सूचक करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रियंका बंडगर यांना रिंगणात उतरविले असले तरी, उपमहापौर गट व स्वाभिमानीशी आघाडी झाली तरच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सभापती निवडीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
...तर आम्ही किंगमेकर
महापौर शिकलगार यांनी पेंढारींची समजूत काढून, सुनीता खोत यांना सभापती करण्याचा शब्द दिला आहे. तो शब्द त्यांनी पाळावा. सभापती उपमहापौर गटाचा होईल अथवा आम्ही या निवडणुकीत किंगमेकर ठरू, असा दावाही माने यांनी केला. तसेच शिकलगार यांनी, असा कुठलाही शब्द आपण दिला नसल्याचे स्पष्ट केले.