बंडखोर खासदार संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचा निर्णय ही राजकीय आत्महत्या; शिवसेनेची टीका
By भीमगोंड देसाई | Published: July 20, 2022 02:28 PM2022-07-20T14:28:39+5:302022-07-20T14:29:14+5:30
कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. ती विकासनिधीपेक्षा स्वाभिमानाला जास्त जपते.
कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय राजकीय आत्महत्या असल्याची टीका पक्षाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी पत्रकार परिषदेत केली. मतदार त्यांना धडा शिकवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदी म्हणाले, खासदार मंडलिक, माने हे शिवसेनेमुळे खासदार झाले. त्यांना खासदार करण्यात शिवसैनिकांचा वाटा मोठा आहे. मंडलिक यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेताना सामान्य, कडवट शिवसैनिकांना विचारले नाही. केवळ आपल्या गटाचा मेळावा घेऊन निर्णय जाहीर केला. त्यांच्या निर्णयाचा शहर शिवसेनेतर्फे आम्ही निषेध करतो.
ते शिंदे गटामध्ये गेल्यानंतर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी विकास निधीसाठी आणि तेरा, चौदा खासदार जात आहेत, मी एकटा थांबून काय करू ? असा प्रतिप्रश्न विचारला. मंडलिक यांचा निर्णय सामान्य शिवसैनिकांच्या पचनी पडलेला नाही. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. ती विकासनिधीपेक्षा स्वाभिमानाला जास्त जपते. याचे प्रत्यंतर त्यांना निवडणुकीत नक्कीच येईल.
अहो...मी तुमच्यासोबतच..
खासदार मंडलिक यांनी शिंदे गटात जाणार असल्याची माहिती देण्यासाठी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी या दोघांनी मंडलिक यांना थांबण्याचा सल्ला दिला नाही. मंडलिक यांनी आपला निर्णय सांगितला व जिल्ह्याच्या राजकारणात मी तुमच्यासोबत असेन, असा ‘शब्द’ त्यांनी मुश्रीफ व सतेज पाटील यांना दिल्याची माहिती मोदी यांनी दिली..
वडिलांकडून संघर्षाचा आदर्श घ्यावा
दिवंगत ज्येष्ठ नेते सदाशिवराव मंडलिक यांनी कठीण प्रसंगात स्वाभिमानाच्या जीवावर वेगवेगळी चिन्हे घेऊन लढून विजय मिळविला. वडिलांच्या या संघर्षाचा संजय मंडलिक यांनी आदर्श घ्यायला पाहिजे होता, असे शिवसेना शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी सांगितले.
आमिषे दाखवली जात आहेत
शहरातील निष्ठावंत शिवसैनिकांना शिंदे गटाकडे खेचण्यासाठी विविध आमिषे दाखविली जात आहेत पण याला येथील पदाधिकारी बळी पडणार नाहीत, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
रेल्वे बोर्डाच्या सदस्यत्वाचा राजीनामा
खासदार मंडलिक यांनी आपल्या कोट्यातून पुणे रेल्वे बोर्डावर सदस्य म्हणून सुनील मोदी यांची निवड केली होती पण मंडलिक शिंदे गटात गेल्याच्या निषेधार्थ मोदी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याची माहिती मोदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.