‘रंकाळा’ प्रभागाला अपुऱ्या निधीचे ग्रहण
By admin | Published: March 4, 2015 11:26 PM2015-03-04T23:26:40+5:302015-03-04T23:52:21+5:30
कामे जास्त, निधी कमी : नव्याने वाढणाऱ्या वसाहतींमुळे पायाभूत सुविधांची मागणी जास्त
भौगोलिकदृष्ट्या मोठ्या व उपनगरात येणाऱ्या या प्रभागात फुलेवाडी, अंबाई टँक, हरिओमनगर, साने गुरुजी पूर्व बाजू, रंकाळा तलाव परिसर अशी रचना आहे. या प्रभागाला अंतर्गत रस्ते, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि ड्रेनेजच्या समस्येने ग्रासले आहे. याचबरोबर शहराच्या एका बाजूला असणाऱ्या या प्रभागात रस्त्यांची लांबी अधिक असल्याने निधीची चणचण मोठ्या प्रमाणात जाणवते. ऐतिहासिक रंकाळ्याचा भाग असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांना नेहमीच आवाज उठवावा लागतो. अशा या प्रभागात कामे अधिक अन् निधी अपुरा, अशी स्थिती झाली आहे.
या प्रभागात नव्याने जादा बांधकामे होत आहेत. या बांधकामांमुळे अंतर्गत गटारी, ड्रेनेज पाईपलाईन, आदींसाठी निधीची बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी नगरसेविका पाटील यांना सातत्याने प्रयत्न करावा लागतो. सतत बदल होणाऱ्या या प्रभागात रंकाळा प्रदूषण, इराणी खण परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण, पथदिवे, आदी कामांची मोठी यादी आहे. यातच लाखो रुपये खर्चून पक्षी निरीक्षण केंद्राची स्थापना केली आहे. मात्र, याचा वापर म्हणावा तितका होत नाही. सायलेन्स झोन असूनही अवजड वाहतूक होत असते. रंकाळ्याभोवतीची वाढती अतिक्रमणे ही समस्या वाढू लागली आहे.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नगरसेविका पाटील यांनी पहिल्या वर्षापासून अंबाई टँक, मोहिते पार्क, डोंगळेनगर, टाकळकर कॉलनी, फुलेवाडी बसस्टॉप, आदी भागांतील समस्यांना प्राधान्य दिले आहे.
हरिओमनगर येथील नागरिकांनी या परिसरात मोबाईल टॉवर लावण्यास विरोध केला आहे. यासाठी मी नगरसेविका म्हणून त्यांच्याबरोबर राहिले. यापुढेही टॉवरच्या विरोधात उभी राहणार आहे. याचबरोबर भौगौलिकदृष्ट्या मोठ्या असणाऱ्या या प्रभागात कामे अनेक आहेत. कामे करण्याची इच्छा प्रबळ आहे. मात्र, निधी कमी पडत आहे.
- रेखा पाटील, नगरसेविका