मिणचेत मुलींच्या नावे ठेवपावती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:26+5:302021-04-08T04:25:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : मिणचे येथे ग्रामपंचायतीच्यावतीने येत्या वर्षभरापासून गावात जन्माला येणाऱ्या मुलींच्या जन्माचे स्वागत करून, या मुलींच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : मिणचे येथे ग्रामपंचायतीच्यावतीने येत्या वर्षभरापासून गावात जन्माला येणाऱ्या मुलींच्या जन्माचे स्वागत करून, या मुलींच्या नावे ठेवपावती, तसेच मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कारासाठी अर्थसाहाय्य, तर आशा स्वयंसेविकांना प्रति महिना रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी फक्त ग्रामपंचायत कर भरणाऱ्या कुटुंबासाठी पारदर्शक आगळीवेगळी योजना राबविण्यात आली आहे.
मिणचे येथे बेटी बचाव बेटी पढाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आपलाही सहभाग असावा, मुलींचा जन्मदर नक्कीच वाढावा याकरिता ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या मार्गदर्शनातून, तर सरपंच रंजना अशोक जाधव, उपसरपंच अभिनंदन शिखरे, ग्रामविकास अधिकारी धनाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नातून साकारला आहे.
मुलींच्या जन्माचे स्वागत करून या मुलींच्या नावे ठेवपावती, तर मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. तसेच आशा स्वयंसेविकांना प्रति महिना पाचशे रुपये मदत देण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात एप्रिलपासून करण्यात आली आहे. यामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी भरणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची वसुलीही होणार आणि चांगला उपक्रम राबविल्याचे समाधानही मिळणार आहे.