पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्ग दुहेरीकरणास मान्यता
By admin | Published: May 26, 2016 12:02 AM2016-05-26T00:02:35+5:302016-05-26T00:22:26+5:30
कामास सुरुवात होणार : ३ हजार ६२७ कोटींच्या अपेक्षित खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची मंजुरी
नवीदिल्ली/सांगली/मिरज : रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या पुणे-मिरज-लोंढा या ४६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी तीन हजार ६२७ कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने बुधवारी मान्यता दिली. मिरज-पुणे दुहेरीकरणाच्या कामाची निविदा काढण्यात आल्याने दुहेरीकरणाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे मिरजेतून केवळ चार तासांत पुण्याला पोहोचता येणार आहे.
मिरज-पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याने या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यास मिरजेतून पुणे, मुंबई प्रवास जलद व सोयीचा होणार आहे. लोंढा-मिरज-पुणे या मार्गाच्या दुहेरीकरणाची अनेक वर्षांची मागणी आहे. यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी अर्थिक तरतूद करण्यात आल्याने कामास गती मिळाली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने पुणे ते मिरज दरम्यान दुहेरीकरणाच्या कामाची तीन टप्प्यात निविदा प्रसिद्ध केली असून तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी लोंढा ते मिरज या १९० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाच्या कामाची निविदा दक्षिण-पश्चिम रेल्वेने काढली आहे. लोंढा-मिरज-पुणे या दुहेरीकरणासाठी ३ हजार ६२७ कोटी रूपये खर्चास बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याने दुहेरीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे.
या मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर विद्युतीकरणाच्या कामाची स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे. यावर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकात कोल्हापूर- मिरज- पुणे या २८० किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी ३२६ कोटी रूपये व मिरज-लोंढा या १८९ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी २०८ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्यानंतर रेल्वेगाड्यांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्'ातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असतानाही गेल्या चाळीस वर्षात महालक्ष्मी, सह्याद्री व कोयना या तीनच एक्सप्रेस प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत.
रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या हमसफर, तेजस व उदय या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या वातानुकूलित व सुपरफास्ट
एक्स्प्रेस कोल्हापूर-मिरज- मुंबई मार्गावर सुरु करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
असे होणार दुपदरीकरण
पुणे-मिरज-लोंढा मार्ग एकूण ४६७ किलोमीटरचा आहे. याच्या दुपदरीकरणासाठी पाच वर्षांचा कालावधी गृहीत धरण्यात आला असून, एकूण खर्च ३ हजार ६२७ कोटी ४७ लाख रुपये अपेक्षित आहे. प्रतिवर्षी पाच टक्के साहित्य दराच्या वाढीचा विचार करून हा खर्च ४ हजार २४६ कोटी ८४ लाख गृहीत धरला आहे.
कऱ्हाड-चिपळूण
रेल्वेमार्गाची प्रतीक्षा
कऱ्हाड-चिपळूण व कोल्हापूर-वैभववाडी या नवीन रेल्वेमार्गाचे अद्याप सर्वेक्षण सुरू आहे. नवीन रेल्वेमार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकणला जोडला जाणार असल्याने कोकणाला जोडणाऱ्या नवीन रेल्वेमार्गाची प्रतीक्षा सुरू आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मार्गाच्या दुपदरीकरणासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत होतो. प्रभू यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली होती. या मार्गाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यातील प्रवाशांना होणार आहे. मिरज-लोंढा मार्गावर सांगली, कऱ्हाड आणि सातारा ही महत्त्वाची स्थानके आहेत.
- संजयकाका पाटील, खासदार, सांगली