जयसिंगपुरात मुलींच्या वसतिगृहास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:23+5:302021-03-19T04:22:23+5:30
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरात मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी समाजकल्याण विभागाकडून नवीन शासकीय वसतिगृहास मान्यता मिळाली आहे. शंभर विद्यार्थ्यांची क्षमता असलेले ...
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरात मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी समाजकल्याण विभागाकडून नवीन शासकीय वसतिगृहास मान्यता मिळाली आहे. शंभर विद्यार्थ्यांची क्षमता असलेले १६ कोटी ५५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने पहिल्या टप्प्यात ७५ विद्यार्थिनींसाठी १० कोटी २१ लाखाचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आरोग्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. तालुक्याच्या गावातून विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणानिमित्त या ठिकाणी येतात. यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी- विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. या मुलींसाठी शासकीय वसतिगृहाची इमारत उपलब्ध नव्हती. मुलींसाठी नवीन शासकीय वसतिगृहाची इमारत मंजूर व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्याचाच भाग म्हणून जयसिंगपूरमध्ये मागासवर्गीय मुलींसाठी नवीन शासकीय वसतिगृह मान्यता मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात १० कोटी २१ लाखांचा निधी मंजूर झाला असून उर्वरित निधी प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
फोटो - १८०३२०२१-जेएवाय-०४-राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर